‘त्या’ पोस्टवर वाद, इस्रायलची केंद्राकडे तक्रार; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 03:39 PM2023-11-25T15:39:37+5:302023-11-25T15:45:27+5:30

Sanjay Raut News: संजय राऊतांनी लिहिलेल्या एका पोस्टवर इस्रायलने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, केंद्राकडे याप्रकरणी तक्रार केली आहे. नेमके प्रकरण काय? जाणून घ्या...

shiv sena thackeray group mp sanjay raut reaction about israel wrote to india central govt over hitler post remark | ‘त्या’ पोस्टवर वाद, इस्रायलची केंद्राकडे तक्रार; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

‘त्या’ पोस्टवर वाद, इस्रायलची केंद्राकडे तक्रार; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Sanjay Raut News: हमास आणि इस्रायलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. पॅलेस्टाइन आणि इस्रायलमधील तणावरही वाढताना दिसत आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टवरून नवा वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे. या पोस्टवरून इस्रायल दुतावासाने केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भूमिका स्पष्ट केली. 

संजय राऊत यांनी या युद्धाबाबत केलेल्या एक्स पोस्टवरून इस्रायलने संताप व्यक्त केला आहे. इस्रायलच्या दुतावासाने यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात संजय राऊतांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टचा कडक शब्दांत निषेध नोंदवला. यासंदर्भात मीडियाशी बोलताना संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. इस्रायलच्या या भूमिकेवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. 

युद्धाचे काही नियम असतात

त्यांना पत्र लिहू द्या. इस्रायलच्या भावनांचा आदर करतो. पोस्टमध्ये काय लिहिले होते? ज्या पद्धतीने गाझातील रुग्णालयांवर सातत्याने बॉम्ब फेकले जात आहेत. मोठे स्फोट घडवून आणले जात आहे. त्यामुळे तिथले लोक, रुग्ण मारले जात आहे. रुग्णालयामधील नवजात शिशूंना दूध मिळत नाही, पाणी मिळत नाही, हे सगळे चुकीचे आहे. युद्धाचे काही नियम असतात. महाभारताच्या काळापासून किंवा त्याच्या आधीपासून युद्धाचे नियम बनले आहेत, त्या नियमांचे पालन करत आलो आहोत. त्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. गाझापट्टीमध्ये लहान मुले, मुली त्यांचे पालक असे सगळेच निरपराध लोक मारले जात आहेत. त्यांना मदत मिळायला हवी. युद्धाचे नियम पाळले जायला हवेत. याबद्दल माझी टिप्पणी केली. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यात काय करू शकतो. जगभरात ज्यू राहतात, भारतातही आहेत. भारतात आपण त्यांना वर्षानुवर्षे प्रेम दिले, असे संजय राऊतांनी सांगितले.

दरम्यान, संजय राऊतांनी इस्रायल आणि हमास युद्धामुळे गाझातील परिस्थिती विषद करणारी एक बातमी एक्सवर पोस्ट केली होती. हिटलर ज्यूंचा इतका तिरस्कार का करत होता, हे आता समजतेय का?, असा प्रश्न उपस्थित करत कमेंट केली होती. या पोस्टवरून गदारोळ झाला आणि त्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली. असे असले तरी ही पोस्ट इस्रायलच्या दुतावासांपर्यंत पोहोचली. याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत इस्रायल दुतावासाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून याबाबत तक्रार केली.
 

Web Title: shiv sena thackeray group mp sanjay raut reaction about israel wrote to india central govt over hitler post remark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.