“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 12:33 IST2025-11-15T12:33:04+5:302025-11-15T12:33:04+5:30
Bihar Election 2025 Result: बिहार निवडणुकीचे जे काही निकाल आले, त्याने कुणालाही धक्का बसलेला नाही. हा निकाल अपेक्षित होता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
Bihar Election 2025 Result: भाजपाला विनंती करेन की, बिहार, महाराष्ट्रात लढणे सोडून द्या. अमेरिकेत आता उमेदवार उभे करा. तेथील राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवा आणि तेथे जिंकल्यावर टॅरिफचा घोळ झाला आहे, तो काढून टाका. तसेच यूएन जनरल असेंब्लीमध्ये उमेदवार उभे करा. सिक्यूरिटी काउंसिलमध्ये उभे करा. तिथेही तुमचा काय दबदबा आहे, तो निवडणूक आयोगाने दाखवू द्या, असा खोचक टोला ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावला.
राहुल गांधी यांनी देशातील काही राज्यांमध्ये व्होटचोरी कशी झाली हे दाखवले. त्यानंतर आम्ही वरळीत काय झाले, हे दाखवले. लवकरच मुंबई आणि महाराष्ट्रात काय झाले, हे दाखवणार आहोत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यात आपण पाहिले असेल की, अशी काही उदाहरणे समोर आली आहेत की, कोणी पुण्यात मतदान केले आहे, त्याच व्यक्तीने जाऊन बिहारमध्ये मतदान केले आहे. कुणी दिल्लीत मतदान केले, त्याच व्यक्तीने जाऊन बिहारमध्ये मतदान केले. वाराणसीतील भाजपा पदाधिकारी बिहारमध्ये जाऊन मतदान करत होते, असा मोठा दावा आदित्य ठाकरेंनी केला.
बिहार निवडणूक निकालाने कुणालाही धक्का बसलेला नाही
हे सगळे पाहून देश म्हणून आपण शांत बसणार असू, तर हुकुमशाहीला आमंत्रण देत आहोत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. बिहार निवडणुकीचे जे काही निकाल आले, त्याने कुणालाही धक्का बसलेला नाही. हा निकाल अपेक्षित होता. कारण निवडणूक आयोग कुणाचा आहे, हे सर्वांना माहिती आहे. मी मनापासून निवडणूक आयोगाचे अभिनंदन करतो की, त्यांचा मोठा विजय झालेला आहे. साधारण ६५ लाख मतदार कमी केल्यानंतर काय होऊ शकते, हे पाहायला मिळाले, या शब्दांत आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) विक्रमी विजय मिळवित राजद-काँग्रेस प्रणित महाआघाडीचा अक्षरशः सुपडा साफ केला. २४३ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे जवळपास निश्चित आहे. भाजप तब्बल ८९ जागांवर आघाडी मिळवित अव्वल पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये प्रथमच भाजपला इतके मोठे यश मिळाले आहे. गेल्या वेळी ४३ जागांवर मर्यादित राहिलेल्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने यंदा ८५ जागांवर यश मिळविले आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानेही २९ जागांपैकी १९ जागांवर विजय मिळविला आहे. बिहारमध्ये अधिक जागा पदरात पाडून घेऊनही काँग्रेसला जेमतेम सहा जागा मिळाल्या. बिहारमध्ये काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.