Shiv Sena, MNS face to face for hindu vote | शिवसेना, मनसे भगव्यासाठी आमने-सामने; भाजपला बसणार फटका ?
शिवसेना, मनसे भगव्यासाठी आमने-सामने; भाजपला बसणार फटका ?

मुंबई - मराठी मतांच्या जोरावर राजकीय उदयास आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या भूमिकेत काहीसा बदल करून हिंदुत्वाची कास धरण्यास सुरुवात केली आहे. मागील अनेक वर्षांपासून शिवसेना पक्ष भाजपच्या साथीत हिंदुत्वाच्या मुद्यावर मार्गक्रमण करता आला. मात्र भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेने थोडा बदल केला. हीच संधी साधून मनसेने हिदुत्वाच्या मुद्दाला हात घातला. मात्र मनसेच्या नव्या भूमिकेचा फटका महाविकास आघाडीपेक्षा भाजपलाच बसण्याचा संभव आहे. 

नुकत्याच झालेल्या मनसेच्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी मी रंग बदलत नाही, असं म्हटलं होते. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला अंतरंग देखील भगवा असल्याचे म्हटले होते. ठाकरे बंधुंच्या या जुगलबंदीमुळे भविष्यात दोन्ही ठाकरे भगव्यासाठी आणि हिंदुत्वासाठी आमने-सामने येण्याची दाट शक्यता आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत असलेली अनेक वर्षांची मैत्री तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीत सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी चर्चा सुरू झाली होती. हाच धागा पकडून मनसेने हिंदुत्व पुढे आणले असून त्यासाठी भगव्याची साथ घेतल्याचे दिसते.

दरम्यान शिवसेना आणि मनसे भगव्यासाठी लढत असताना भाजप देखील हिंदु मतांसाठी प्रयत्नशील आहे. मात्र भाजपचे धोरण सबका साथ सबका विकास असल्यामुळे भाजपला हिंदू मतांसह इतर मतांची गोळाबेरीज करावी लागणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसे या पक्षांप्रमाणे भाजपला प्रखर हिंदूत्व घेऊन पुढे जाणे शक्य होणार नाही. अशा स्थितीत कट्टर हिंदुत्वाची कास धरणाऱ्या मनसेला फायदा होऊ शकतो. तर शिवसेना आहे त्या स्थितीत राहण्याची शक्यता दिसून येते. त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीला याचा फारसा फरक पडेल असं वाटत नाही.  
 

Web Title: Shiv Sena, MNS face to face for hindu vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.