मुंबई - मागील २ दिवसांपासून राज्यात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. कल्याण डोंबिवलीतील पक्षप्रवेशावरून भाजपा आणि शिंदेसेनेत संघर्ष शिगेला पोहचला आहे. याठिकाणी भाजपाने शिंदेसेनेचे पदाधिकारी फोडले. त्यानंतर संतापलेल्या शिंदेसेनेने थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यातच उद्धव ठाकरे यांच्याकडूनही एकनाथ शिंदे यांना घेरण्याची तयारी सुरू झाली आहे. शिदेंचा गड मानला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात उद्धव ठाकरेंनीएकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. शिंदेसेनेचे प्रमुख पदाधिकारी पुन्हा उद्धवसेनेत परतले आहेत.
ठाण्यातील शिंदेसेनेचे उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह उद्धवसेनेत प्रवेश केला आहे. इतकेच नव्हे तर एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ कोपरी पाचपाखाडीमधील उपविभागप्रमुख आबा मोरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर उद्धवसेनेत प्रवेश केला त्याशिवाय नवी मुंबईतील शिंदेसेनेचे सहसंपर्कप्रमुख शिरीष काशिनाथ पाटील, उपविभागप्रमुख मयूर ठाकूर आणि संदिप साळवे यांनीही कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी ३ वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली त्यानंतर ४० आमदारांसह अनेक पदाधिकारी शिंदेंसोबत गेले. मागील अडीच ते तीन वर्ष सातत्याने एकनाथ शिंदे यांच्याकडे इनकमिंग सुरू आहे. मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेला धक्का देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
महायुतीत वाद वाढला
नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीतील सत्ताधारी शिंदेसेना आणि भाजपा बऱ्याच ठिकाणी आमनेसामने आल्याचे चित्र आहे. त्यात सिंधुदुर्ग नगरपालिका निवडणुकीत शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना टार्गेट करून भाजपा पैसे वाटप करत असल्याचे स्टिंग ऑपरेशन केले. त्यानंतर मालवणमध्ये ऐन मतदानाच्या आदल्या रात्री अज्ञात वाहनातून भाजपा पदाधिकारी पैसे वाटत असल्याचे पकडल्यानंतर निलेश राणे यांनी मध्यरात्री पोलीस स्टेशन गाठले. कल्याण डोंबिवलीतही शिंदेसेनेचे अनेक पदाधिकारी भाजपात घेण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे शिंदेसेनेने भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल करत भाजपाला इशारा दिला आहे. त्यामुळे महायुतीत तणाव वाढल्याची चिन्हे आहेत.
राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर
राज्यातील या राजकीय घडामोडींमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे दिल्लीत असल्याचं सांगितले जात आहे. राज ठाकरे यांची सून मिताली ठाकरे यांचे भाऊ डॉ. राहुल बोरुडे यांचे ५ डिसेंबरला दिल्लीत लग्न पार पडणार आहे. या सोहळ्याला ठाकरे परिवारातील जवळचे नातेवाईक उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील अनेक मान्यवर या सोहळ्याला येतील. तिथे अनौपचारिक भेटीही होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ६ डिसेंबरला राज ठाकरे मुंबईत परतण्याची शक्यता आहे.
Web Summary : Uddhav Thackeray gains ground in Thane as Shinde Sena members defect. BJP-Shinde Sena tensions rise over party entries. Raj Thackeray visits Delhi for a family event amidst political buzz.
Web Summary : उद्धव ठाकरे ने ठाणे में शिंदे सेना के सदस्यों के दलबदल से बढ़त बनाई। पार्टी प्रवेश को लेकर भाजपा-शिंदे सेना में तनाव बढ़ा। राज ठाकरे राजनीतिक चर्चाओं के बीच एक पारिवारिक कार्यक्रम के लिए दिल्ली गए।