महाराष्ट्र निवडणूक 2019: 'शिवसेना चिट्स महाराष्ट्र'...सोशल मीडियावर ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 21:55 IST2019-11-10T21:34:42+5:302019-11-10T21:55:07+5:30
गेल्या महिनाभरात गुगलवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सर्वाधिक सर्च केले गेले आहे. #ShivSenaCheatsMaharashtra

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'शिवसेना चिट्स महाराष्ट्र'...सोशल मीडियावर ट्रोल
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळूनही सत्ता स्थापन करता आलेली नाही. भाजपाने आज माघार घेतल्याचे राज्यपालांना कळविले. तसेच शिवसेनेवर जनादेशाचा अपमान केल्याचा आरोप भाजपाने केला. यानंतर लगेचच ट्विटरवर शिवसेना ट्रोल होऊ लागली आहे.
गेल्या महिनाभरात गुगलवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सर्वाधिक सर्च केले गेले आहे. तर त्यापाठोपाठ काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्च केले गेले आहे. विशेष म्हणजे सत्तास्थापनेच्या राजकारणात पवारांनीच सर्व सुत्रे त्यांच्याकडे ठेवली होती.
ट्विटरवर #ShivsenaCheatsMaharashtra असा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला असून काही तासांत 20 हजारावर ट्विट करण्यात आले आहेत. तसेच यामध्ये त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे मिम्स व्हायरल केले आहेत. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेस विरोधी, हिंदुत्वाबाबतची वक्तव्ये जोडून ती टाकली जात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचे व्हिडीओही व्हायरल होऊ लागले आहेत.
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावा यासाठी उद्धव ठाकरेशरद पवार यांची भेट घेण्यची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधी देखील शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले होते.