"...म्हणून जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का?", जयंत पाटलांचा महायुती सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:59 IST2025-04-17T12:58:55+5:302025-04-17T12:59:52+5:30

Jayant Patil vs Mahayuti Government: राहुरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारे आरोपी २० दिवसानंतरही मोकाट

Sharad Pawar NCP Jayant Patil criticized Mahayuti government over the desecration Chhatrapati Shivaji Maharaj statue in Rahuri | "...म्हणून जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का?", जयंत पाटलांचा महायुती सरकारला सवाल

"...म्हणून जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का?", जयंत पाटलांचा महायुती सरकारला सवाल

Jayant Patil vs Mahayuti Government: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात दिवसाढवळ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध राहुरीत जनक्षोभ उसळला. २६ मार्च रोजी घडलेल्या या घटनेतील आरोपी मोकाट असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला. या प्रकरणातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तसेच पोलिसांच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करत त्यांनी राहुरीत बेमुदत उपोषण सुरू केले. मात्र आरोपींना लवकरच शोधून काढू असे आश्वासन दिल्यावर हे उपोषण मागे घेण्यात आले. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला काही तिखट सवाल केले.

जयंत पाटील ट्विटच्या माध्यमातून म्हणाले की, अलीकडच्या काळात सातत्याने राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या घटना घडत आहेत. मूलभूत प्रश्न बाजूला सारण्यासाठी जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का? अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. समाजात अस्थिरता निर्माण करून आपण विकासाचे नक्की कोणते पाऊल उचलू पाहत आहोत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देशभर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांचा अपमान करणाऱ्यांना मोकाट सोडायचे हा या सरकारचा दुटप्पीपणा आहे अशी टीका असतानाच त्यांनी गृहमंत्रालयाने अशा सर्व घटनांचा त्वरित छडा लावण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला द्यायला हवे.

छत्रपती शिवरायांचा विचार चिरकाल टिकावा, त्यांच्या आदर्शाचे संस्कार पुढील पिढीवर व्हावे आणि समाजात एकोपा नांदावा यासाठी प्राजक्त तनपुरे यांनी सुरू केलेला लढा अधिक बळकट व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असेही जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.

नेमकी घटना काय?

२६ मार्च २०२५ रोजी राहुरीतील बुवासिंदबाबा तालमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. ही घटना स्थानिकांसाठी धक्कादायक आणि चीड आणणारी होती. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या कृत्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी सर्वत्र जोर धरू लागली. पण घटनेला २० दिवसांहून जास्त काळ लोटला तरीही पोलिसांना आरोपींचा शोध लावता आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आणि तमाम शिवप्रेमींमध्ये कमालीचा असंतोष आहे. तसेच, प्रशासनावरील नाराजीही वाढत चालली आहे.

Web Title: Sharad Pawar NCP Jayant Patil criticized Mahayuti government over the desecration Chhatrapati Shivaji Maharaj statue in Rahuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.