“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:11 IST2025-10-17T14:08:59+5:302025-10-17T14:11:02+5:30
Sharad Pawar PC News: राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही, अशी टीका शरद पवारांनी केली.

“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका
Sharad Pawar PC News: गेले महिनाभर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होती. काही ठिकाणी पूर काही ठिकाणी महापूर होता. याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त झाली आहे. तिथली जमिनी खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. त्याच्यादृष्टीने शेतीची जमीन हे त्याचे सर्वस्व आहे. त्याचे सर्वस्व वाहून गेले आहे. कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरी करणार? म्हणून त्याच्या दुःखात आमच्या संघटनेने सहभाग घ्यायचा निर्णय घेतला, अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, संकट येतात, पण अशावेळी ज्यांच्या हातात राज्याची देशाची सत्ता आहे, त्यांची जबाबदारी असते की, लोकांना संकटातून बाहेर काढणे, लोकांना मदत करणे. राज्य सरकारने काही रक्कम जाहीर केली. पण नुकसानीचे स्वरूप पाहिले, तर या तोकड्या रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल असे वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकारवर हा संकटग्रस्त नाराज आहे. मी एवढेच सांगू इच्छितो की, हे जे काही घडते, ते दुःखद आहे, त्याबाबत मला अधिक भाष्य करायचे नाही, असे शरद पवार म्हणाले.
शेतकऱ्यांना सढळहस्ते मदत करायची तयारी नाही
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. मला यामध्ये राजकारण आणायचे नाही. पूरग्रस्त भागातील लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. आम्ही तशी तयारी राज्य सरकारकडे दाखवली. पण शेतकरी आणि पूरग्रस्तांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची तयारी आतापर्यंत तरी दिसून आलेली नाही. मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही. त्यामुळे आमच्या पक्षाला राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, पुरंदर विमानतळाचा विषय हा मोबदलाबाबत नाही. काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, विमानतळाची जागा बदला. हा निर्णय मी किंवा सरकारी अधिकारी घेऊ शकत नाहीत. हा केंद्र सरकारचा विषय आहे. प्रश्न असा आहे की, जिथे विमानतळ बांधण्यात येईल, तेथील शेतकऱ्यांची शेती ताब्यात घेतली जाईल. अशा सर्वांचे पुनर्वसन आणि नुकसान भरपाई कशी दिली जाईल, याबाबत शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना विनंती करणार आहे की, तुम्ही या कामाच्या संदर्भात काहीतरी मार्ग काढा. दिवाळी संपल्यावर मुख्यमंत्र्यांची वेळ घेईल ते सांगतील तेव्हा या विषयावर बोलू, असे शरद पवारांनी म्हटले आहे.