शक्तिपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातील सोळा गावांतून जाणार, नवीन आराखड्याबाबत गोपनीयता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:46 IST2026-02-05T13:45:31+5:302026-02-05T13:46:22+5:30
Shaktipeeth Mahamarg: शिखर शिंगणापूर, गोंदवले तीर्थक्षेत्र जोडणार : कारखेल, दिवड, कुकुडवाड, मायणीजवळून सांगलीत प्रवेश

शक्तिपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातील सोळा गावांतून जाणार, नवीन आराखड्याबाबत गोपनीयता
सातारा : राज्यात अनेक ठिकाणी विरोध होत असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचाच मार्ग बदलण्यात येणार असून, तो सातारा जिल्ह्याच्या माण आणि खटाव तालुक्यांतील जवळपास १६ गावांतून जाणार आहे. याबाबत ऑन रेकाॅर्ड काहीही समोर आलेले नसले तरी तशा हालचाली मात्र सुरू आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील गारवडमधून हा मार्ग साताऱ्यातील कारखेलमध्ये येणार आहे. तेथून पर्यंती, दिवड, कुकुडवाडवरून खटावमधील पडळनंतर मायणीजवळून सांगली जिल्ह्यात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मार्गामुळे माणमधील शिखर शिंगणापूर आणि गोंदवले बुद्रुक ही दोन तीर्थक्षेत्रेही जोडली जाणार आहेत.
राज्यातील विविध धार्मिक स्थळांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून निघणार असून, कोकणातील पत्रादेवीपर्यंत जाणार आहे. हा मार्ग १२ जिल्ह्यांतून जाणार होता. सुमारे ८०२ किलोमीटर अंतर होते; पण या महामार्गाला सांगली-कोल्हापूरसह काही जिल्ह्यांत विरोध झाला. त्यामुळे याचा मार्ग बदलण्याचा निर्णय झालेला आहे.
वाचा: हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेली जमीन शक्तीपीठाला देणार नाही, शेती बचाव समितीचा इशारा
शक्तिपीठ महामार्ग पूर्वी सोलापूर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात जाणार होता. तो आता सोलापूरमधून सातारा जिल्ह्यात येणार आहे. जिल्ह्यातील माण तालुक्यातील १० आणि खटावमधील ६ गावांच्या हद्दीतून तो सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यातील या गावांच्या समावेशाची शक्यता
माण तालुका : कारखेल, पर्यंती, खडकी, वरकुटे - म्हसवड, वाकी, दिवड, धामणी, गटेवाडी, वडजल, कुकुडवाड.
खटाव तालुका : कान्हरवाडी, हिवरवाडी, पडळ, कानकात्रे, अनफळे, मायणी.
ग्रामविकासमंत्र्यांचेही सूतोवाच
माण आणि खटाव तालुक्यांतील प्रमुख देवालये शक्तिपीठ महामार्गावर आणण्यात येणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.
नवीन मार्गाबाबत गोपनीयता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘शक्तिपीठ होणारच; पण मार्ग बदलून,’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे नव्याने आराखडा करण्याचे काम सुरू आहे. मात्र त्यासंबंधी अधिकृतपणे कुणीही बोलत नाही. सध्या तरी चांगलीच गोपनीयता बाळगण्यात येत आहे.
शक्तिपीठापासून शिंगणापूर ४५, तर गोंदवले अंतर १५ किलोमीटर
शक्तिपीठ महामार्ग माणमधील गोंदवलेपासून १५ किलोमीटर आणि शिखर शिंगणापूरपासून ४५ किलोमीटरवरून जाणार असल्याचे समजते. याबाबतची अधिसूचना येत्या १५ दिवसांत निघण्याची शक्यता आहे. महामार्ग तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी आवश्यक भूसंपादन गतीने पूर्ण करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील बैठकीत दिला आहे.