विधिमंडळ अधिवेशनावर सावरकर वादंगाची छाया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 06:39 AM2019-12-16T06:39:50+5:302019-12-16T06:41:05+5:30

विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार

Savarkar controversy shadow over legislative winter session of nagpur | विधिमंडळ अधिवेशनावर सावरकर वादंगाची छाया

विधिमंडळ अधिवेशनावर सावरकर वादंगाची छाया

Next

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्याविषयी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ज्यांनी सावरकरांचा अपमान केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांच्या चहापानाला जाणार नाही, असे सांगत विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला, तर नागरिकत्व कायदा हाच मुळात सावरकरांच्या विचारसरणीविरुद्ध असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.


केवळ सहा दिवस चालणाºया या अधिवेशनात सावरकरांच्या अपमानावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक अत्यंत आक्रमक भूमिका घेतील, असे दिसते. दुसरीकडे जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा भाजपचा डाव असल्याची भूमिका घेत, सत्तारूढ महाविकास आघाडी भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे.


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर, विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रपरिषदेत ठाकरे म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायदा हा घटनेला धरून आहे का, याचा फैसला कोर्टात होऊ द्या, त्यानंतर शिवसेना आपली भूमिका जाहीर करेल. या कायद्याविषयी आम्ही उपस्थित केलेले प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. त्याविषयी स्पष्टता आल्यानंतर आम्ही आमचे म्हणणे मांडूच. आम्ही कुणाच्या दबावामुळे भूमिका बदलली नाही आणि बदलणार नाही. शेजारी देशातील अल्पसंख्यांक असुरक्षित असतील तर मोदी सरकारने त्या देशांना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची ताकीद का दिली नाही, उलट तुम्ही तेथील हिंदूंना या कायद्याच्या निमित्ताने असुरक्षित करीत आहात, असे ठाकरे म्हणाले.


महिला अत्याचार, रोजगार, शेतकºयांचे गंभीर प्रश्न असे अनेक विषय देशासमोर असताना नको त्या गोष्टींकडे लोकांना वळविण्याचे कारस्थान भाजप रचत आहे. लोकांना सतत तणावात ठेवायचं, परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची पण आपला कारभार उरकून घ्यायचा अशी भाजपची रणनीती दिसते, असा आरोप ठाकरे यांनी केला.

मतभिन्नता असेल पण
सरकारमध्ये एकवाक्यता

अनेक मुद्यांवर महाविकास आघाडीतील तीन पक्षांत मतभिन्नता आहे आणि राहील, पण सरकार चालविताना आमच्यात एकवाक्यता आहे आणि राहील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

तर मग सावरकरांना
केंद्राने भारतरत्न द्यावे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी आमच्या मागणीची वाट केंद्र सरकार करीत आहे का, कॅबप्रमाणे या संदर्भातही केंद्राने स्वत:हून भूमिका घ्यावी आणि भारतरत्न द्यावे, असे आव्हान ठाकरे यांनी केले.

सातबारा कोरा करण्याचे
वचन पूर्ण करूच : मुख्यमंत्री

शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्याचे वचन आम्ही दिलेले आहे आणि ते पूर्ण करूच, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, विरोधक याबाबत काय आरोप करताहेत ते सोडा, मी विरोधकांना नाही तर राज्यातील जनतेला बांधील आहे आणि त्यांना दिलेले वचन पाळणार आहे, असे ठाकरे म्हणाले.


श्वेतपत्रिका लवकरच
राज्याच्या तिजोरीची चावी आमच्याकडे आलेली आहे, पण अजून मी तिजोरी उघडलेली नाही. आढावा घेतोय. जनतेला दिलेली वचने नक्कीच पूर्ण करू. पण राज्याच्या तिजोरीची नेमकी स्थिती मी सांगणार आहे, असे सांगत आर्थिक स्थितीविषयीची श्वेतपत्रिका लवकरच काढणार असल्याचे ठाकरे यांनी सूचित केले.

शिवस्मारकात घोटाळ्याची नक्कीच
चौकशी करणार

मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामात घोटाळे झाल्याच्या तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यांची चौकशी केली जाईल. असा भ्रष्टाचार झालेला असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यात कुणी दोषी आढळले तर निश्चितपणे कारवाई केली जाईल. स्मारकाच्या कामात काळंबेरं असेल तर ते नक्कीच दूर करू, पण भव्यदिव्य स्मारक नक्कीच उभारले जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
तुळजा भवानी मंदिर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतील कथित घोटाळ्यांची माहिती घेतली जाईल, असेही ते एका प्रश्नात म्हणाले.

Web Title: Savarkar controversy shadow over legislative winter session of nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.