संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 14:21 IST2025-10-31T14:12:27+5:302025-10-31T14:21:20+5:30
Sanjay Raut News: विरोधकांवर तुटून पडणारी शिवसेना ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ असा लौकिक असलेले ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे पुढचे दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत. स्वत: संजय राऊत यांनी पत्र लिहून याबाबतची माहिती दिली असून, त्यामागचं चिंताजनक कारणही समोर आलं आहे.

संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासह मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजणार आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून अनेक आव्हानांचा सामना करत असलेल्या शिवसेना ठाकरे गटासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह सर्व नेत्यांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र या निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विरोधकांवर तुटून पडणारी शिवसेना ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ असा लौकिक असलेले ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे पुढचे दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत. स्वत: संजय राऊत यांनी पत्र लिहून याबाबतची माहिती दिली असून, त्यामागचं चिंताजनक कारणही समोर आलं आहे.
या पत्रात संजय राऊत यांनी सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्यामागचं कारण सांगताना लिहिलंय की, आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या, असे आवाहन संजय राऊत यांनी .पत्राच्या शेवटी केले आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 31, 2025
दरम्यान, संजय राऊत यांनी या पत्रामधून त्यांच्या आजारपणाबाबत स्पष्ट उल्लेख केलेला नाही. मात्र राऊत यांनी दिलेल्या या माहितीमुळे निवडणुकांची रणधुमाळी तोंडावर असताना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तसेच शिवसैनिकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.