Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीस हे अशा प्रकारच्या टपल्या, टिचक्या, टोमणे मारण्यात पटाईत आहेत. त्यांनी एखादा टोमणा, टपली, टिचकी मारली असेल. ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. शिवसेना सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेचे नाव आणि चिन्ह या संदर्भात एक लढा देत आहे. आम्हाला खात्री आहे की, न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. यावेळेस पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर प्रश्न विचारला. याला उत्तर देताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा, शिवसेना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिवसेना म्हणून जे डुप्लिकेट लोक बसलेले आहेत, त्यांचा विचार फडणवीस यांना आधी करावा लागेल. आपल्यासोबत डुप्लिकेट ठेवायचे की असली ठेवायचे. सध्या तरी त्यांचा सर्व कारभार डुप्लिकेट लोकांना घेऊन सुरू आहे. डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस, डुप्लिकेट शिवसेना. त्यामुळे शिवसेनेचे सध्या चाललेले आहे ते उत्तम चाललेले आहे, असे संजय राऊत म्हणाले.
ही वैचारिक दिवाळखोरी आहे
राजकारण आणि बहुमत फार चंचल असते, लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे की, बहुमत, राजकारण हे चंचल आणि अस्थिर असतात. उद्या काय होईल ते सांगता येत नाही. याला मी ऑफर म्हणत नाही. देवेंद्र फडणवीस हे डुप्लिकेट शिवसेना आणि डुप्लिकेट राष्ट्रवादीसोबत सत्ता भोगत आहेत. त्याला कुठलाही वैचारिक किंवा नैतिक आधार नाही, असे असताना तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देत आहात ही वैचारिक दिवाळखोरी आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.
दरम्यान, तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे, त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल, अशी ऑफर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेतच दिल्याने माध्यमांना बातम्यांचा एक विषय मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ऑफर दिली तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे झाले होते, तर नजीकच्या भविष्यात आणखी काही धक्कादायक घडणार की काय, अशी चर्चा आमदारांमध्ये रंगली.