sack to sanjay raut from all posts sambhaji bhide urges to cm uddhav thackeray | 'उद्धव ठाकरेंना कळकळीची प्रार्थना करतो की...', संभाजी भिडेंची विनंती

'उद्धव ठाकरेंना कळकळीची प्रार्थना करतो की...', संभाजी भिडेंची विनंती

सांगली : माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज (17 जानेवारी) शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे. हा बंद मागे घेण्याची मागणी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संभाजी भिडे यांच्याकडे केली. यावेळी आमचा हा बंद शिवसेनेच्या विरोधात नाही. पण, शिवेसना प्रमुख उद्धव ठाकरे यांना एक कळकळीची प्रार्थना करेन की, त्यांनी संजय राऊतांना आवरावे आणि त्यांना पदावरून दूर करावे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. 

संभाजी भिडे म्हणाले, "संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. त्यांना राष्ट्रपतीच्या इतकाच मान मिळाला पाहिजे." याचबरोबर, 'सांगलीचा बंद हा समाजाच्या अंतःकरणातला संताप व्यक्त करण्यासाठी आहे. हा बंद शिवसेनेच्या विरोधात नाही. छत्रपती परंपरा ही हिंदुस्थानची प्राणभूत परंपरा आहे. शिवसेना देशभरात वाढावी अशी आपलीही इच्छा आहे, कारण अन्न, पाणी, वाऱ्याइतकीच शिवसेनेची देशाला आवश्यकता आहे, असे संभाजी भिडे यांनी सांगितले. 

याशिवाय, उद्धव ठाकरे यांना एक कळकळीची प्रार्थना करतो की, त्यांनी चाणाक्षपणा दाखवत संजय राऊत यांना बाजूला करून समाजस्वास्थ्य बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी. शिवसेनेबद्दलचे लोकांचे मत कलंकित होणार नाही. त्यामुळे शिवसेनेला ज्याच्यामुळे बदनाम होण्याची वेळ येईल, अशी विधाने करणारे संजय राऊत यांना कुठल्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे संभाजी भिडे म्हणाले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपण छत्रपतींचे वासर असल्याचे पुरावे द्यावेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. यावरून सध्या राज्यात वादाला तोंड फुटले आहे. गेल्या बुधवारी ‘लोकमत’च्या वतीने पुण्यात आयोजित 'लोकमत पत्रकारिता पुरस्कार' सोहळ्यात संजय राऊत यांची विशेष मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी संजय राऊत यांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदरच करतो. महाराजांचे नाव जिथे येते, तिथे आम्ही नतमस्तकच होतो. पण शिवाजी महाराज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणविणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले होते. 

आणखी बातम्या..

संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन

गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप

मध्य रेल्वे विस्कळीत; सायन-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे

इस्रोची पुन्हा एकदा गगनभरारी, GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Web Title: sack to sanjay raut from all posts sambhaji bhide urges to cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.