गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 08:46 AM2020-01-17T08:46:18+5:302020-01-17T08:49:16+5:30

गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बस आज शुक्रवारी सकाळी 7च्या सुमारास घोडबंदर मार्गावरील टोलनाक्याजवळ अचानक जळून खाक झाली.

Passenger luxury bus fires, driver and passenger safe towards Thane from Gujarat | गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप

गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप

googlenewsNext

मीरा रोड - गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बस आज शुक्रवारी सकाळी 7च्या सुमारास घोडबंदर मार्गावरील टोलनाक्याजवळ अचानक जळून खाक झाली. आतील प्रवासी व वाहन चालक आदी आधीच बसमधून बाहेर पडल्याने बचावले. गुजरातवरून प्रवाशांना घेऊन चाललेली लक्झरी बस काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरसावेजवळ घोडबंदर मार्गावरचा टोलनाका ओलांडून ठाण्याच्या दिशेला जात होती.

बसच्या मागील भागात आग लागल्याचे कळताच चालकाने बस थांबवली. बसमधील प्रवासीदेखील जिवाच्या भीतीने घाबरून बाहेर पडले. काही जण तर साखर झोपेत होते. आग लागल्याचे कळताच मीरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. पुढील भाग जळण्यापासून वाचला असला तरी यात बहुतांश बस जळून खाक झाली. प्रवाशांचे सामान जळल्याची शक्यता आहे.

बसचे मागचे टायर घासून आग लागली असल्याची प्राथमिक शक्यता लोकांनी वर्तवली आहे. बसमध्ये किती प्रवासी होते व बस कुठून कुठे जाणार होती याची माहिती घेणे सुरू असल्याचे अग्निशमन दलाचे छोटू आदिवाल म्हणाले. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी करत आहेत. 

Web Title: Passenger luxury bus fires, driver and passenger safe towards Thane from Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.