योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:44 IST2025-10-09T12:40:52+5:302025-10-09T12:44:40+5:30
पोलिसांच्या रिपोर्टमध्ये सचिन घायावळची सगळी पार्श्वभूमी लिहिली आहे. तरीही योगेश कदमांनी कुठल्या मोबदल्यात त्याला शस्त्र परवाना मिळवून दिला? असा सवाल अनिल परब यांनी केला.

योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
मुंबई - मुली नाचवून जे लोक दलालीचे पैसे खातायेत, गँगस्टर लोकांना पोसण्याचं काम करत आहे. गँगस्टरच्या हातात अधिकृत शस्र परवाना देण्याचं काम गृह राज्यमंत्री करतायेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेमकी अडचण काय? अशा मंत्र्यांना सोबत घेऊन स्वत:ची प्रतिमा मलिन का करतायेत हे कळत नाही. योगेश कदम यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. अधिवेशनात आम्ही आवाज उचलू मात्र जर योगेश कदम यांची हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. लोकांच्या सुरक्षेची सरकारला काही पडली नसेल परंतु विरोधी पक्ष म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी दिला आहे.
अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुंडाचा भाऊ असलेल्या व्यक्तीला अधिकृत शस्त्र परवाना दिला. पोलिसांनी हा परवाना नाकारला. पोलिसांनी त्यांचे काम चोख केले होते. परंतु योगेश कदमांनी पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश रद्द केले. पुणे जिल्ह्यात आज ७० टोळ्या सक्रीय आहेत. निलेश घायावळचा भाऊ सचिन घायावळ याच्यावर खंडणी, खूनासारखे गंभीर गुन्हे आहेत. पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता सचिन घायावळ याला शस्त्र परवाना नाकारला परंतु गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्र लिहून हा शस्त्र परवाना मिळवून दिला. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये सचिन घायावळची सगळी पार्श्वभूमी लिहिली आहे. तरीही योगेश कदमांनी कुठल्या मोबदल्यात त्याला शस्त्र परवाना मिळवून दिला? असा सवाल अनिल परब यांनी केला.
तसेच पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला असताना गृह राज्यमंत्री परवाना देतात. त्यातून पोलिसांचे ध्यर्यखच्चीकरण करण्याचं काम त्यांनी केले. उद्या दाऊद मुंबईत आला, तो दोषमुक्त झाला तर त्यालाही परवाना देणार का? डान्सबार, वाळू उपसा आणि आता हा शस्त्र परवाना प्रकरण याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. पोलिसांनी परवाना का नाकारला याची कारणे तपासली जातात. हा गुंड आहे. गुंडाचा भाऊ असून पुण्यात दहशत आहे. त्याच्यावर खूनाचे, खूनाचा प्रयत्न आणि खंडणीचे गुन्हे आहेत असं पोलिसांनी सांगितले. परंतु इतक्या गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या गुंडांना शस्त्र परवाना देताना एकतर आर्थिक मोबदला घेतला असेल किंवा भविष्यात माझ्यासाठी तुला काहीतरी काम करावे लागेल असं सांगून हा परवाना दिला असेल असा आरोपही अनिल परब यांनी केला.
दरम्यान, निलेश घायावळ आणि सचिन घायावळ खूनाच्या प्रकरणात एकत्र होते. अशा गुंडांना तुम्ही शस्त्रे परवाने देताय त्यातून तुमची सुटका होऊ शकत नाही. योगेश कदम यांनी अशाप्रकारे किती शस्त्र परवाने दिले आहेत त्याची माहिती आता घेतोय. अर्धन्यायिक न्यायाधीशांच्या खुर्चीत बसून तुम्ही असे शस्त्र परवाने कसे देऊ शकता? मुख्यमंत्र्यांची अशी काय मजबुरी आहे अशा मंत्र्यांना सोबत ठेवले आहे? गृह, महसूलसारखी खाती या दिवट्याला दिली आहेत. त्याठिकाणी बसून हे काय काय प्रताप करत आहेत हे दिसून येते असंही अनिल परब यांनी म्हटलं.