Maharashtra Election 2019 : अमृता वहिनींच्या टीकेला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर, पण टार्गेट मुख्यमंत्रीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 15:47 IST2019-10-17T15:45:11+5:302019-10-17T15:47:25+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election : वास्तविक पाहता ही टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असली तरी अमृता वहिणांना हे प्रत्युत्तर होतं, अशी चर्चा सभेत सुरू होती. नाशिक येथील सभेत राज बोलत होते.

Maharashtra Election 2019 : अमृता वहिनींच्या टीकेला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर, पण टार्गेट मुख्यमंत्रीच
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला आहे. त्यामुळे टीका टिप्पणी देखील वाढल्या आहेत. यात अनेक नेत्यांकडून बोलण्याच्या ओघात नको ते शब्द तोंडातून निघतात. तर अनेक जण पातळी राखून टीका करताना दिसतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतीच राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावताना अमृता वहिनींना प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले.
काही वर्षांपूर्वी अभिनेत्री विद्या बालन हिचा 'डर्टी पिक्चर' नावाचा चित्रपट आला होता. त्या चित्रपटातील एक डायलॉग चांगलाच गाजला होता. यामध्ये ती म्हणते मी एक एन्टरटेन्मेंट...एन्टरटेन्मेंट....एन्टरटेन्मेंट आहे. अर्थात मनोरंजन...मनोरंजन....मनोरंजन. राज ठाकरे यांची भाषणं म्हणजे नुसतं मनोरंजन...मनोरंजन...मनोरंजन... असा खोचक टोला अमृता फडणवीस यांनी लगावला होता. यावर राज ठाकरे काय उत्तर देणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. परंतु, राज यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर न देता त्यांच्या पतीदेवांवर टीका केली.
जगात फक्त पुरुष गरोदर राहू शकत नाही. तेवढी एकच गोष्ट शक्य नाही, बाकी सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आता काहीजण गरोदर असल्यासारखे वाटतात, असं म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता टीका केली. एवढच नाही तर तो पुरूष कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावर सभेत एकच हशा पिकला होता.
वास्तविक पाहता ही टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असली तरी अमृता वहिनींना हे प्रत्युत्तर होतं, अशी चर्चा सभेत सुरू होती. नाशिक येथील सभेत राज बोलत होते.