दक्षिण भारताला पावसाचा इशारा

By Admin | Updated: September 29, 2015 03:14 IST2015-09-29T03:14:03+5:302015-09-29T03:14:03+5:30

उत्तर भारतातून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सूनही अद्यापही राजस्थान, पंजाब आणि हरियाणातच असल्याची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली

Rain sign to south India | दक्षिण भारताला पावसाचा इशारा

दक्षिण भारताला पावसाचा इशारा

मुंबई : उत्तर भारतातून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सूनही अद्यापही राजस्थान, पंजाब आणि हरियाणातच असल्याची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली. तर दुसरीकडे वातावरणात होत असलेल्या संभाव्य बदलामुळे पुढील ७२ तासांत दक्षिण भारतात मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा स्कायमेटने दिला आहे.
मागील दोन आठवड्यांत पश्चिम बंगालसह गुजरात आणि कर्नाटकवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ठिकठिकाणी चांगल्या पावसाची नोंद झाली. आता कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील २४ तासांत राज्यात सर्वत्र हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. २९, ३० सप्टेंबरसह १, २ आॅक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील ४८ तासांत मुंबईत आकाश ढगाळ राहील.
स्कायमेटकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मान्सूनने तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण कर्नाटकाच्या आतील भागात चांगली हजेरी लावली. मान्सून परतीच्या वाटेवर असताना पुढील ७२ तासांत दक्षिणेला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शिवाय बंगालच्या उपसागरापासून ते उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीला कमी दाबाचा पट्टा तयार झाला
आहे. त्यामुळे चांगला पाऊस अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rain sign to south India