सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 07:41 IST2025-10-04T07:41:31+5:302025-10-04T07:41:51+5:30
गुजरातमध्ये कोसळणारा परतीचा पाऊस ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुंबईसह राज्यभरात पुन्हा बरसेल.

सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
मुंबई : गुजरातमध्ये कोसळणारा परतीचा पाऊस ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुंबईसह राज्यभरात पुन्हा बरसेल. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील. तर १२ ऑक्टोबरनंतर मान्सून एक्झिट घेईल, असा अंदाज आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार, हवामान विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार, मध्य भारत व महाराष्ट्राच्या काही भागात दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे.
चक्रीवादळ ‘शक्ती’
गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात दाखल झाले. त्यामुळे मुंबईत पाऊस पडला. हे क्षेत्र अरबी समुद्रात दाखल झाल्यावर त्याचे रूपांतर ‘शक्ती’ चक्रीवादळात झाले. मुंबईपासून ८०० सागरी मैलांवर गुजरातपासून पश्चिम-दक्षिण दिशेला हे वादळ आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत हे वादळ गुजरातकडे सरकेल. मात्र, तोवर त्याचा जोर कमी होईल. मुंबईला या वादळाचा धोका नाही, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली.
ऑक्टोबर तापदायक नसेल
यंदा ऑक्टोबर हीटचा त्रास जाणवणार नाही. त्यामुळे हा महिना तितकासा तापदायक नसेल. ऑक्टोबरमध्ये मुंबईचे कमाल तापमान ३६ किंवा ३७ अंश नोंदविण्यात येते. यावर्षी कमाल तापमान ३२ ते ३३ अंशांपर्यंत राहील. अशीच कमी-अधिक स्थिती राज्यभरात राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे हीटपासून सुटका होणार आहे.