“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 20:09 IST2025-10-04T20:09:28+5:302025-10-04T20:09:28+5:30
Prakash Ambedkar News: सत्ताधारी म्हणतात की, दिवाळीला मदत देऊ. मात्र, दिवाळीला मदत येणार नाही, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
Prakash Ambedkar News:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने ओबीसींचा घात केला. एवढे ओबीसींनी डोक्यात घ्यावे, तरच ओबीसी आरक्षण वाचेल. स्थानिक पातळीवर जे आरक्षण निघत होते, त्यात ओबीसी नेतृत्व पुढे येत होते. आता तेही हातातून जाण्याची शक्यता आहे. नुसते राजकीय आरक्षण जाणार नाही, तर शैक्षणिक आरक्षण सुद्धा जाईल. त्यामुळे ओबीसींनी वेळीच सावध व्हावे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
एका सभेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपाला मतदान दिले म्हणजे ते आपले मालक झाले नाहीत. जर मालक बनण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आपटल्या शिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. आता शेतकरी विचार करत आहे की, आम्हाला जी खावटी मिळायची ती यावेळी मिळाली नाही. घरातील सगळे वाहून गेले आहे, जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे, अशी टीका आंबेडकरांनी केली.
मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का?
भाजपा, आरआरएस विचारसरणीत मदत हा शब्दच नाही. त्यामुळे आता तरी धडा शिकला पाहिजे. सत्ताधारी म्हणतात की, दिवाळीला मदत देऊ. मात्र, दिवाळीला मदत येणार नाही. गरीब, वंचितांना मदत करण्याचा त्यांचा पायंडाच नाही. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज ओबीसी समाजातील लाखोंचे श्रद्धास्थान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अकोल्यात दर महिन्यात येतात. मात्र, एकदा तरी शेगावला दर्शनासाठी जातात का? तर अजिबाज नाही. आता मी बोलल्यावर कदाचित ते शेगांवला जातीलही. पंढरपूरचे नाव मी घेत नाही. कारण पंढरपूर दूर आहे. परंतु, ते ज्या ठिकाणी येतात, तेथून गजानन महाराजांचे ठिकाण ३५ किमीवर आहे, असे आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, दलित, वंचित आदिवासी समाजातील उच्चशिक्षित अनेक हुशार तरुणांचा गेल्या १० वर्षात जातीयवादी लोकांनी जीव घेतला. त्यांची प्रगती मनुवाद्यांचा डोळ्यात खुपत होती, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला.