महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी इतिहासकाळापासून भाऊबंदकीचा वाद आहे. पेशवाईच्या काळात तर काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला. ‘काका, मला वाचवा’ म्हणून पळत येणा-या नारायणराव पेशवाने राघोबादादाला घातलेली हाक आजही राजकारणात दिली जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे, श्रीमंत अभयसिंहराजे भोसले-छ. उदयनराजे भोसले, अनिल देशमुख-आशीष देशमुख या काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष महाराष्ट्रने पाहिला आहे.महाराष्ट्राच्या राजकारणातील काही काका-पुतणे यांच्यात जसा संघर्ष आहे, तशी काही जणांमध्ये अजुन तरी एकवाक्यता टिकून आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर आपली अमीट छाप पाडणारे शरद पवार यांनी पुतण्या अजित पवारांना राजकारणात आणले, पण आजवर कितीही कठीण प्रसंग आला तरी उभयतांनी नात्याची लक्ष्मणरेषा ओलांडली नाही. नाशकात छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या काका-पुतण्यांचे नातेही असेच घट्ट आहे. दोघांनाही तुरुंगवारी घडली तरी, त्या वेदनेतही आपल्या नात्याची वीण त्यांनी उसवू दिली नाही. लातूरमध्ये स्व.विलासराव देशमुख यांचे पुत्र आ. अमित देशमुख आणि त्यांचे काका दिलीपराव देशमुख यांचेही नाते राजकारण विरहित राहिले आहे. काका-पुतणे दोघेही राजकारणात असले तरी त्यांनी आपल्या नातेसंबंधात राजकारण आडवे येऊ दिलेले नाही.


बीड जिल्ह्यात भाऊबंदकीमध्येच संघर्ष
बीड : बीड जिल्ह्यातील काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्टÑाला सर्वश्रूत आहे. गोपीनाथ मुंडे आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या काका-पुतण्यातील संघर्ष महाराष्टÑाने पाहिला आहे. आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ह्या बहिण-भावात या संघर्षाने टोक गाठले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत परळीतून धनंजय यांना उमेदवारी न देता पंकजांना उमेदवारी मिळाली व त्या पहिल्यांदा आमदार झाल्या आणि इथेच कौटुंबिक कलहाची पहिली ठिणगी पडली, तिचे राजकीय कलहात रुपांतर झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या बहिण-भावाची कडवी लढत गाजली होती. पंकजांनी जवळपास २५ हजार मताधिक्याने धनंजय यांचा दणदणीत पराभव केला होता. यावेळीही अशीच लढत या पहावयास मिळणार आहे.


बीमध्ये रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील कलहही विकोपाला गेला आहे. बीड नगराध्यक्षपदासाठी डॉ.भारतभूषण आणि संदीपचे वडील रविंद्र क्षीरसागर या भावात लढत होऊन भारतभूषण विजयी झाले असले तरी त्यांचे पुतणे तथा संदीपचे लहान भाऊ हेमंत यांच्याकडे सभागृहात बहुमत होते. याच बहुमताच्या जोरावर हेमंत यांनी उपनगराध्यक्षपदी विराजमान होत आपल्या काकावर म्हणजे भारतभूषण आणि जयदत्त यांच्यावर मात केली होती.
वाद इतका विकोपाला गेला की, जयदत्त क्षीरसागर यांना राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन शिवसेनेत जावे लागले. आता संदीप हे राष्टÑवादीकडून इच्छुक असून त्यांची लढत काका जयदत्त यांच्याशीच होऊ शकते. गेवराईत सेनेला जागा सुटली तर माजी मंत्री बदामराव पंडित आणि त्यांचे पुतणे राष्टÑवादीचे माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यात लढतीची शक्यता आहे.


खासदार काका विरुद्ध आमदार पुतण्या!
अलिबाग- रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि आमदार अवधूत तटकरे या काका-पुतण्यांमध्ये सध्या राजकीय शीतयुद्ध सुरु आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी तटकरे घराण्यातील भाऊबंदकीत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काही कालावधीपुरतेच उभयतांमधील शीतयुद्ध शमले होते. अवधूत हा सुनील तटकरे यांचे थोरले बंधु अनिल तटकरे यांचा मुलगा आहे. सुनील तटकरे यांनीच अनिल तटकरे यांना विधान परिषदेवर तर अवधूत यांना श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आणले होते. तसेच वहिनी शुभदा तटकरे यांनाही रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आणत महिला व बाल कल्याण सभापतीपद दिले होते. असे असतानाही दोन्ही भावातील संघर्ष काहीना काही कारणांनी उफाळून येतो.


Web Title: Political war between uncle and nephew!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.