Railway: रेल्वे स्थानकांवर आता खा पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राईज; १७ ठिकाणी डेक सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 07:57 IST2025-11-19T07:56:12+5:302025-11-19T07:57:52+5:30
उपनगरी स्टेशनवर आता पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईस हे खाद्यपदार्थ मिळणार आहेत.

Railway: रेल्वे स्थानकांवर आता खा पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राईज; १७ ठिकाणी डेक सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उपनगरी स्टेशनवर आता पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईस हे खाद्यपदार्थ मिळणार आहेत. यासाठी रेल्वे बोर्डाने रेल्वे स्टेशनवर ‘प्रीमियम ब्रँड केटरिंग आउटलेट्स’ ही स्टॉल्सची एक नवीन श्रेणी मंजूर केली. ज्यामुळे आता प्रचलित खाद्यपदार्थांच्या कंपन्यांना त्यांचे कॅफे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रेल्वे स्टेशनवर सध्या ३ प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स सुरू करण्यास परवानगी आहे. यामध्ये चहा, बिस्किट, नाश्ता स्टॉल्स, दुग्धजन्य पदार्थ आणि ताज्या फळांचे रस विकण्याचे काउंटर यांचा समावेश आहे. या ठिकाणी रेल्वेने ठरवून दिलेल्या प्रमाणात आणि किमतीमध्ये खाद्य पदार्थ विकण्यास परवानगी आहे. आता नव्याने समाविष्ट केलेल्या श्रेणीमध्ये कंपनीला त्यांच्या किमतीत आणि ते ठरवतील त्या प्रमाणामध्ये खाद्यपदार्थांची विक्री करण्यास परवानगी असणार आहे.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर असलेल्या ९० चौरस फुटांच्या स्टॉल्सचे वार्षिक परवाना शुल्क ४ ते ५ लाख रुपये असते. परंतु, प्रीमियम केटरिंग स्टॉल्ससाठी जास्त जागा देण्यात येणार आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘प्रीमियम ब्रँड केटरिंग आउटलेट’चे वाटप ई-लिलाव धोरणानुसार केले जाईल.
१७ स्टेशनवर डेक सुविधा
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या १७ रेल्वे स्टेशनवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून डेक उभारले जात आहेत. या माध्यमातून रेल्वेला सुमारे ६.४३ लाख चौरस फूट किंवा १४७ एकरपेक्षा जास्त जागा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी हे डेक उभारले जात असून, या जागेचा व्यावसायिक वापरही करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.