Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 09:35 IST2025-10-25T09:34:27+5:302025-10-25T09:35:38+5:30
Satara Phaltan Women Doctor death case, Crime news: पीडित डॉक्टरने पोलीस, राजकारणी यांच्याकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) आणि उप-अधीक्षक (DSP) यांना दोन ते तीन वेळा लेखी तक्रारी केल्या होत्या.

Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
महिला डॉक्टरने दोन-तीन वेळा एसपी, डीएसपींकडे लेखी तक्रारी देऊनही त्यावर कारवाई होत नसल्याने थेट डीएसपींना फोन केला होता, असे आता समोर येत आहे. पिडीतेच्या आतेभावाने हा गंभीर आरोप केला आहे.
पीडित डॉक्टरने पोलीस, राजकारणी यांच्याकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) आणि उप-अधीक्षक (DSP) यांना दोन ते तीन वेळा लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, तिच्या तक्रारींची प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. 'माझ्यासोबत काही वाईट घडल्यास, याला जबाबदार कोण?' असा सवाल तिने आपल्या पत्रातून विचारला होता.
उपजिल्हा रुग्णालयाच्या आवाराच्या सुरक्षेचा मुद्दा देखील तिने उपस्थित केला होता. परंतू, त्यावरही काही झाले नव्हते. एवढेच नव्हे एवढ्या वरिष्ठ पातळीवर तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नाही म्हणून मयत डॉक्टरने पोलीस उप-अधीक्षकांनाही फोन केला होता. त्यांनी तुला नंतर फोन करतो, असे सांगितले. परंतू कारवाई केली नाही, असा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
केवळ एकच महिना राहिलेला...
महिला डॉक्टर गेल्या २३ महिन्यांपासून फलटण उपजिल्हा रुग्णालयात सेवा देत होती. डॉक्टरला प्रक्टीस सुरु करण्यापूर्वी ग्रामीण भागात सेवा देणे बंधनकारक असते. यासाठी तिचा बॉन्ड संपण्यास केवळ एक महिनाच उरला होता. यानंतर ती पुढील शिक्षण घेणार होती. परंतू, त्यापूर्वीच तिला आपले आयुष्य संपवावे लागले.