Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 19:44 IST2025-10-26T19:41:58+5:302025-10-26T19:44:58+5:30
Phaltan Doctor case in Marathi: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील एक आरोपी असलेला पोलीस गोपाळ बदने हा ४८ तास फरार होता. तो कुठे कुठे लपला होता, याबद्दल माहिती समोर आली आहे.

Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
Phaltan Doctor Death news Today in Marathi: फलटणमधील डॉक्टर तरुणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदने हा पोलिसांना शरण आला. पण, त्यापूर्वी ४८ तास तो फरार होता. डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याचे अखेरचे ठिकाण पंढरपूर होते. पण, त्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर तो पोलिसांना शरण आला. फलटण पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केल्यानंतर ४८ तासात तो कुठे कुठे गेला होता, याची माहिती समोर आली आहे.
निलंबित पीएसआय गोपाळ बदने हा डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्यानंतर फरार झाला होता. मयत डॉक्टर तरुणीने हातावर सुसाईड नोट लिहिलेली होती. त्यात गोपाळ बदनेचेही नाव आहे.
पंढरपुरातून सोलापूर, नंतर बीड; मग परत का आला?
एपीबीच्या रिपोर्टनुसार, आरोपी गोपाळ बदने हा पंढरपूरला होता. तिथून तो सोलापूरला गेला. तिथून तो बीडला गेला. बदने सोशल मीडियाच्या माध्यमातून सोलापुरातील काही पोलिसांच्या संपर्कात होता. बीडला घरी गेल्यानंतर तो परत पंढरपूरला आला आणि नंतर फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला.
गोपाळ बदने हजर झाला नाही, तर त्याला बडतर्फ केले जाईल, असा निरोप बदनेच्या कुटुंबीयांपर्यंत दिला गेल्याची माहिती आहे. त्यानंतरच त्याने आत्मसमर्पण केले. गोपाळ बदनेने शनिवारी रात्री फलटण येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. मध्यरात्री १२.३० वाजता तो पोलीस ठाण्यात हजर झाला होता.
आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरुणीचे गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरला कॉल
ज्या दिवशी डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली, त्याआधी प्रशांत बनकर आणि तिच्यात वाद झाल्याचीही माहिती आहे. आरोपी प्रशांत बनकरच्या घराच्या वरच्या मजल्यावर डॉक्टर तरुणी राहत होती. त्यांच्यात वाद झाला. प्रशांत बनकरने तिच्या घराला कुलूप लावले.
त्यामुळे तिला लॉजवर राहण्यासाठी जावं लागलं. तणावात असतानाच डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने यांना अनेक वेळा कॉल केले होते. त्यानंतर तिने आत्महत्या केली.