मुंबई: सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास प्रदूषण नियामक मंडळाने परवानगी दिली आहे. दीड दिवसाच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनावेळी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्यास भाग पाडल्याने भाविकांनी पालिकेच्या धोरणावर टीका केली होती. या गोंधळानंतर पर्यावरणपूरक मूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याची मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली होती. याला आता समितीने मान्यता दिली आहे.
मुंबईत दीड दिवसाच्या गणेश विसर्जनादरम्यान शाडूच्या मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली होती. घरगुती किंवा सार्वजनिक मंडळांच्या कमी उंचीच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे लागल्याने अनेक गणेश मंडळांनी आणि भक्तांनी नाराजी व्यक्त केली होती.
याबाबत समितीने प्रदूषण नियामक मंडळाकडे पाठपुरावा केला होता. ही मागणी मान्य करत मंडळाने सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तीचे बाणगंगा तलाव आणि गिरगाव चौपाटी येथे विसर्जन करण्यास परवानगी दिली. परवानगी मिळाल्याबद्दल समितीने मंडळ आणि मुंबई महापालिकेचे आभार मानले आहेत.
कृत्रिम तलाव वाढवलेअखेर राज्य सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील बंदी उठली. मात्र ही बंदी उठवताना सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्तीचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावे असे स्पष्ट आदेश दिले होते. त्यामुळे यंदा पालिकेने कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे. मात्र लहान मूर्तीचे विर्सजन नैसर्गिक स्रोतात करू द्यावे, अशी मागणी होत होती.
शाडू माती दिल्याने मूर्तिकारांना दिलासामहापालिकेने शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शाडू माती मूर्तिकारांना पुरवली होती. यंदा सुमारे एक हजार टन शाडू माती पुरविल्याने मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे.