मावळातून पार्थ पवार हरणार? माढा, बारामतीवरही भाजपचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 21:25 IST2019-03-27T21:24:23+5:302019-03-27T21:25:25+5:30
विदर्भ, मराठवाड्यामध्ये युतीचेच सर्वाधिक खासदार निवडून येण्याची शक्यता सर्व्हेमध्ये वर्तविली आहे.

मावळातून पार्थ पवार हरणार? माढा, बारामतीवरही भाजपचा दावा
मुंबई : पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना लोकसभेच्या 12 जागांपैकी राष्ट्रवादीला केवळ तीनच जागा जिंकता येणार आहे. तर काँग्रेसला एकही जागा जिंकता येणार नसल्याचा अंदाज एबीपी माझा आणि नेल्सनने केलेल्या निवडणूकपूर्व सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आले आहे. तर दोन मतदारसंघात धक्कादायक निकाल लागणार असल्याचे म्हटले आहे.
एबीपी माझा आणि नेल्सनने महाराष्ट्राचा मूड जाहीर केला असून विदर्भ, मराठवाड्यामध्ये युतीचेच सर्वाधिक खासदार निवडून येण्याची शक्यता वर्तविली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात आघाडीच्या बालेकिल्ल्याला पुन्हा एकदा सुरुंग लागणार असल्याचे या सर्व्हेमधून दाखविण्यात आले आहे.
धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार हरणार असल्याचे दिसत आहे. ही जागा पुन्हा शिवसेनाच आपल्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी होणार असल्याचे दर्शविण्यात आले आहे. तर माढा, बारामती या राष्ट्रवादीसाठी महत्वाच्या असलेल्या जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, भाजपच्या प्रवक्त्यांनी माढा, बारामतीमध्ये भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचा दावा केला आहे. साताऱ्यातही राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकणार असल्याचे म्हटले आहे.
तर अहमदनगर भाजप, हातकणंगले स्वाभिमानी, पुणे भाजपकडे राहणार असल्याचे सांगताना कोल्हापुरात मात्र महाडिक गटाला जोरदार धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही जागा शिवसेनेकडे पुन्हा जाणार असल्याचे सर्व्हेमध्ये म्हटले आहे.