पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 11:14 IST2025-05-05T11:14:22+5:302025-05-05T11:14:56+5:30
हे बदमाशांचं सरकार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची एक छटाही दिसत नाही. अशा सरकारला पाठिंबा देणे म्हणजे आपण देशाची बेईमानी केल्यासारखं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: राजीनामा द्यायला पाहिजे होता असं त्यांनी सांगितले.

पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई - पहलगाममध्ये जो काही नरसंहार झाला त्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. संकटकाळी सरकारला पाठिंबा देणे म्हणजे या नरसंहाराला जबाबदार असणाऱ्यांना पाठिंबा देणे असे होत नाही हे आमचे मत आहे असं सांगत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि अमित शाहांवर हल्लाबोल केला. शरद पवारांच्या भेटीबाबत संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्यावेळी राऊतांनी हे विधान केले.
संजय राऊत म्हणाले की, शरद पवार ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आहे. आम्ही जे मत मांडले कदाचित त्यांना ते पटले असेल परंतु त्यांची एक भूमिका आहे. संकटकाळात आपण सरकारसोबत राहायला पाहिजे. परंतु हे सरकार त्या लायकीचं नाही. हे काही इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांचं सरकार आहे का, नरसिंहरावाचं सरकार आहे का...हे बदमाशांचं सरकार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची एक छटाही दिसत नाही. अशा सरकारला पाठिंबा देणे म्हणजे आपण देशाची बेईमानी केल्यासारखं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: राजीनामा द्यायला पाहिजे होता असं त्यांनी सांगितले.
तसेच चून चून के मारेंगे असं गृहमंत्री म्हणतात, कसले चून चून कर मारतायेत,आमचे २७ जण मारले गेलेत. तुम्ही अजून त्या खुर्चीवर का बसलात? मला शरद पवारांनी विचारले, तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला का आला नाहीत, तेव्हा मी आलो असतो तर गोंधळ झाला असता. कारण मी तोंडावर अमित शाहांचा राजीनामा मागितला असता. तुम्हाला सगळ्यांना ते परवडले नसते. सरकारसोबत राहायला हवे असं तुम्ही सगळे म्हणता परंतु मी या मताचा नाही. ज्या सरकारच्या काळात इतका नरसंहार होतो, पुलवामापासून पहलगामपर्यंत..अशा गृहमंत्र्यांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही. मी त्यांचा राजीनामा मागण्यासाठी उभा राहिलो असतो तर तुमची बोलचेल अवघड झाली असती असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान, आम्ही अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करतोय. जर सरकारने काश्मीरवर चर्चा करण्याची हिंमत सभागृहात दाखवली तर राज्यसभेत मी शाहांचा राजीनामा मागेन. लोकसभेत आमचे नेते राजीनामा मागतील. ज्यावेळी हे सुरू होईल तेव्हा सगळे राजीनामा मागतील हे त्यांनाही माहिती आहे. ज्यांना या नरसिंहाचा प्रचंड तिटकारा आहे, अस्वस्थता आहे ते अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करतील असंही संजय राऊत यांनी सांगितले.