"रोज सूर्योदयापूर्वीच उगवणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला", रोहित पवारांनी पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 19:10 IST2026-01-29T19:06:54+5:302026-01-29T19:10:23+5:30
अजित पवारांच्या निधनाने पवार कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार कुटुंबासाठी महत्त्वाचा आधार होते. त्यांनाच काळाने हिरावून नेले. त्यांच्या निधनानंतर रोहित पवारांनी आपल्या भावनांवा वाट मोकळी करून देत सर्वांचे आभार मानले आहे.

"रोज सूर्योदयापूर्वीच उगवणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला", रोहित पवारांनी पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना
बारामतीत उतरण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांना काळाने हिरावून घेतले. अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबीयांना मोठा हादरा बसला. संपूर्ण पवार कुटुंबाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते शोकात बुडाले आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.
अजित पवारांवर गुरुवारी (२९ जानेवारी) दुपारी बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्यभरातून आलेल्या हजारो लोकांनी अजित पवारांना अखेरचा निरोप दिला. अपघात आणि अजित पवारांच्या निधनांची बातमी कळाल्यापासूनच लोकांची बारामतीच्या दिशेने रिघ सुरू झाली होती. सकाळी बारामती प्रतिष्ठान अलोट गर्दीने भरून गेले होते. राज्यभरातून उपस्थित असलेल्या आणि कॉलवरून पवार कुटुंबाच्या दुःखात सहभागी झालेल्यांचे रोहित पवारांनी आभार मानले.
रोज ध्यासाने उगवणारा सूर्य अस्ताला गेला
अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर रोहित पवारांनी एक पोस्ट केली. ते म्हणाले, "महाराष्ट्रावर विकासाचा प्रकाश पाडण्याच्या ध्यासाने रोज सूर्योदयापूर्वीच उगवणारा आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! या सूर्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पवार कुटुंबाला आधार देण्यासाठी आज बारामतीत राज्य आणि देशभरातून आलेले अजितदादांवर प्रेम करणारे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य माणसं यांचं ऋण पवार कुटुंब कदापि विसरणार नाही", अशा भावना रोहित पवारांनी व्यक्त केल्या आहेत.
विमान अपघाताचा तपास एएआबीकडे
अजित पवार यांच्या विमानाचा उतरत असताना अपघात झाला. त्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. बारामतीत झालेल्या या विमान अपघाताबद्दल अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात आल्या. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र पाठवले आणि या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्राची दखल घेत केंद्र सरकारकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्राला उत्तर दिले आहे. नायडू यांनी पत्रात म्हटले आहे की, बारामतीजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताबद्दल तुमचे २९ जानेवारी २०२६ रोजीचे पत्र मला मिळाले.
या दुर्दैवी घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल मी तीव्र दुःख व्यक्त करतो. केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. नियमाप्रमाणे विमान अपघात तपासणी ब्युरो (AAIB) यांनी AAIB नियमांतील संबंधित तरतुदींनुसार तपास सुरू केला आहे. AAIB आणि DGCA यांच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असून ‘ब्लॅक बॉक्स’ सुरक्षितरित्या ताब्यात घेतला आहे आणि तो तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, असे त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्राद्वारे कळवले आहे.