पुणे : ऑटोमोबाईल इंडस्ट्री मंदीतून जात असल्याची ओरड होत असतानाच नाशिकमधील एका तालुक्यातून एकाच दिवशी तब्बल अडीचशे ट्रॅक्टरची विक्री झाल्याचे वृत्त समोर आले आहे. कांद्याला क्विंटलमागे चार अंकी किंमत मिळाल्याने ट्रॅक्टरच्या खरेदीत मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात ही घटना घडली आाहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे निमित्त साधून अडीचशे ट्रॅक्टरची खरेदी केली गेली आहे. जवळपास वर्षापासून ऑटोमोबाईल सेक्टरला मंदीने ग्रासले आहे. दुचाकीसह चारचाकी वाहनांची खरेदी देखील सातत्याने घटत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत होते. केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्रोत्साहन दिल्याने पेट्रोल-डिझेलच्या वाहनांची खरेदी मंदावल्याचीही चर्चा सुरु झाली होती. अखेरीस केंद्र सरकारला पेट्रोल-डिझेलची वाहने इतक्यात हद्दपार होणार नाहीत, असे जाहीर करावे लागले. उद्योगांना देखील अनेक सवलती जाहीर कराव्या लागल्या. गेली पाच वर्षे कांद्याचा सरासरी प्रतिक्विंटल दर १०० ते पाचशे रुपये राहिला आहे. मात्र, या वर्षामध्ये जवळपास दोन महिने कांद्याला क्विंटलमागे दोन हजार ते ४ हजार रुपयांदरम्यान दर मिळाला. किरकोळ बाजारात कांद्याचे प्रतिकिलो दर ६० रुपयांच्या घरात गेले होते. त्यामुळे यंदा कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या खिशात चांगली रक्कम पडली आहे. सध्या देखील घाऊक बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल १५०० ते ३ हजार रुपये मिळत आहे. आता कांद्याचा नवीन हंगाम सुरु होत आहे. देशातील कांद्याचे कोठार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याचे सांगण्यात आले. वाहन क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते कळवण तालुक्यात एकाच दिवश अडीचशे ट्रॅक्टरसह २१ चारचाकी आणि चारशे ते पाचशे दुचाकी विकल्या गेल्या. जवळपास ३० कोटी रुपयांची उलाढाल एकाच दिवशी झाली. त्यातील ७० टक्के रक्कम ही रोख भरली गेली. त्यामुळे वाहन कंपन्यांचे अनेक वरीष्ठ अधिकारी शेतकऱ्यांना वाहन हस्तांतरीत करण्यासाठी उपस्थित राहिले. तसेच, खरेदीदार शेतकऱ्यांचे फेटा बांधून स्वागत करण्यात येत होते. ------------------------
कांद्याने आणला ट्रॅक्टरला '' भाव '' : नाशिकमध्ये एकाच दिवशी अडीचशे ट्रॅक्टरची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 07:00 IST
नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे निमित्त साधून अडीचशे ट्रॅक्टरची खरेदी केली गेली आहे...
कांद्याने आणला ट्रॅक्टरला '' भाव '' : नाशिकमध्ये एकाच दिवशी अडीचशे ट्रॅक्टरची विक्री
ठळक मुद्देकांद्याला चार आकडी दर मिळाल्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या वाहनांची खरेदी मंदावल्याचीही चर्चागेली पाच वर्षे कांद्याचा सरासरी प्रतिक्विंटल दर १०० ते पाचशे रुपये राहिला