आता मराठा आरक्षण आधार!

By Admin | Updated: May 23, 2014 04:18 IST2014-05-23T04:18:00+5:302014-05-23T04:18:00+5:30

विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी काँग्रेस - राष्टÑवादीने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत

Now Maratha reservation base! | आता मराठा आरक्षण आधार!

आता मराठा आरक्षण आधार!

अतुल कुलकर्णी, मुंबई - विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी काँग्रेस - राष्टÑवादीने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठीची एक गोपनीय बैठक वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी घेण्यात आली. आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि दोन दिवस अबोला धरून बसलेले उद्योगमंत्री नारायण राणे त्यास हजर होते. नियोजित वेळेपेक्षा उशिरा ही बैठक सुरू झाली. त्याचवेळी काँग्रेसच्या मंत्र्यांनाही वेगळ्या बैठकीस बोलावले होते. मुख्यमंत्र्यांच्या दालनात काही मंत्री या विषयावर बैठक करत होते तर काही मंत्री वर्षावर मिटिंग हॉलमध्ये प्रतीक्षेत होते. मराठा आरक्षण समिती सदस्यपदी मधुकरराव पिचड, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, फौजिया खान असे मंत्री होते; मात्र या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर. पाटील यांचीही उपस्थिती होती. कोणत्या पद्धतीने हे आरक्षण द्यायचे यावर खल झाला. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता जर आरक्षण दिले गेले तर खुल्या प्रवर्गाचे प्रमाण कमी होईल, तसे झाले तर त्यातूनही नाराजी आणखी वाढेल, असाही सूर या बैठकीत निघाल्याचे समजते. कायद्याच्या चौकटीत राहून हा निर्णय कसा घ्यायचा यावरही अनेक मतप्रवाह निघाले. ज्या पद्धतीने या वेळी हिंदू-मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण झाले ते पाहता मराठा आरक्षणाचा मुद्दा काढला तर अन्य मतांवर त्याचे काय परिणाम होतील याचाही विचार झाल्याचे समजते. या बैठकीनंतर राष्टÑवादीचे मंत्री निघून गेले आणि मुख्यमंत्र्यांसमवेत काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक उशिरापर्यंत चालूू राहिली.

Web Title: Now Maratha reservation base!