“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 20:31 IST2025-11-21T20:30:10+5:302025-11-21T20:31:35+5:30
Shiv Sena Shinde Group News: एकनाथ शिंदे यांचे फोटो बॅनरवरून काढले, तिथे आम्हाला दुखावले, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
Shiv Sena Shinde Group News: काही दिवसांपूर्वी माहिती घेतली. त्यात मला असे दिसले की, या इथे युती तुटण्याचे कारण वरिष्ठ पातळीवरील नेतृत्व नाही, तर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आहेत. त्यांना सिंधुदुर्गाबाबत काय राग आहे, ते माहिती नाही. रत्नागिरीत परिस्थिती पाहिली तर राजापूरमध्ये एखादी जागा, लांजात एखादी जागा शिवसेनेत अॅडजस्ट झाल्या. चिपळूण येथेही तशीच परिस्थिती आहे, मग आमच्या सिंधुदुर्गावर राग का, अशी विचारणा निलेश राणे यांनी केली.
मीडियाशी बोलताना निलेश राणे म्हणाले की, आम्ही मालवण येथे १० जागा द्यायला तयार होतो. सावंतवाडीत दीपक केसरकर ५०-५० च्या फॉर्म्युलासाठी तयार होते. आम्ही सगळे ५०-५० साठी तयार होतो. कणकवलीत तुम्हाला एक ते दोन जागा लढवाव्या लागतील, असे राणे यांनी आम्हाला सांगितले होते. आमचे फोटोही बॅनरवरून काढले. आमचे फोटो काढले असते, तर ठीक होते. पण एकनाथ शिंदे यांचे फोटो काढून टाकले, तिथे आम्हाला दुखवले, असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या बैठकीत काय ठरले, हेही सांगेन
असे असले तरी राणे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य आहे, असे ठरवले होते. राणे यांनीच आम्हाला सांगितले की, तुम्ही आता थांबू नका. कारण तुमचे दिवस फुकट जातील. मग स्वबळासाठी आम्ही मैदानात उतरलो. आम्हाला असे दिसले की, प्रदेशाध्यक्ष एवढे मोठे पद असून, तुम्ही तीन दिवस सिंधुदुर्गात बसलात. हे कशासाठी बसले, ते शेवटच्या टप्प्यात सांगेन. त्यांच्या बैठकीत काय ठरले, हेही सांगेन, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आम्ही चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांचे काम पाहिले आहे. त्यांनी या पदाला किती उंचीवर नेले, हेही आम्ही पाहिले. आपण केवळ दोन-तीन जिल्ह्यांचे राजकारण करू नये, हेच सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता. महायुती का नको याचेही कारण अद्याप समजलेले नाही. हे रविंद्र चव्हाण हेच सांगू शकतील, असे निलेश राणे म्हणाले.