“निवडणुका सोयीने लढायला लागले तर...”; ठाकरे गट स्वबळाच्या तयारीवर सुप्रिया सुळे थेट बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 10:21 IST2025-01-12T10:20:40+5:302025-01-12T10:21:10+5:30

NCP SP Group MP Supriya Sule News: ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात एकमत नसल्याचे सांगितले जात आहे.

ncp sp group mp supriya sule reaction over thackeray group decided to contest election on its own | “निवडणुका सोयीने लढायला लागले तर...”; ठाकरे गट स्वबळाच्या तयारीवर सुप्रिया सुळे थेट बोलल्या

“निवडणुका सोयीने लढायला लागले तर...”; ठाकरे गट स्वबळाच्या तयारीवर सुप्रिया सुळे थेट बोलल्या

NCP SP Group MP Supriya Sule News: विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीत धुसफूस सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यासह सगळीकडे स्वबाळवर लढणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. एकदा आम्हाला आजमवून पाहायचे आहे, असा आक्रमक पवित्रा संजय राऊत यांनी घेतला आहे. यानंतर महाविकास आघाडीसह महायुतीतील नेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. लोकसभा निवडणूक होऊन एवढे महिने झाले. अजून इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. काँग्रेस मोठा पक्ष आहे, त्यांची बैठक बोलावण्याची जबाबदारी आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. यावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

निवडणुका सोयीने लढायला लागले तर...

महानगरपालिकेची निवडणूक आम्ही आधी एकत्र असतानाही वेगवेगळीच लढत होतो. मागची वेळी वेगवेगळे लढलो होतो, त्याच्यामध्ये नवीन काय आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. सगळ्या निवडणुका आपल्या सोयीने लढायला लागले तर कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? त्यांना कधी नाय मिळणार? हे त्यांचीही निवडणूक आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, सुप्रिया सुळे यांची ही भूमिका असली तरी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या तयारीवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकवाक्यता नसल्याचे पाहायला मिळत आहे. जर वेगवेगळे लढले तर मविआतील तीनही पक्षांना त्याचा १०० टक्के फटका बसेल. त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण आहोत. विधानसभेत झालेल्या पराभवानंतर एकत्रित राहायला हवे होते. हा निर्णय फार घाईने घेतला. कार्यकर्त्यांचे मत काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे हा निर्णय योग्य आहे, असे वाटत नाही. त्यांचा पक्ष आहे. त्यांनी निर्णय घ्यावा. शेवटी ओढून कोणाला तरी सोबत घेऊन जाणे, हे आम्हाला पटणार नाही किंवा शोभणार नाही, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. 

----००००----
 

Web Title: ncp sp group mp supriya sule reaction over thackeray group decided to contest election on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.