भाजपाशी जवळीक वाढतेय? छगन भुजबळांकडून RSSची स्तुती; केले श्रीराम पूजन अन् आरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 17:55 IST2025-02-14T17:52:18+5:302025-02-14T17:55:39+5:30
NCP Ajit Pawar Group Leader Chhagan Bhujbal News: छगन भुजबळ हे रामभक्त आहेत. छगन भुजबळ हे मोठ्या शक्तीचे प्रतीक आहेत, असे सांगत RSSच्या बड्या नेत्यांने त्यांचे कौतुक केले आहे.

भाजपाशी जवळीक वाढतेय? छगन भुजबळांकडून RSSची स्तुती; केले श्रीराम पूजन अन् आरती
NCP Ajit Pawar Group Leader Chhagan Bhujbal News: विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठे यश मिळवले. परंतु, त्यानंतर मुख्यमंत्रीपद, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, पालकमंत्रिपदाचा निर्णय यावरून चांगलेच मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावरून अजित पवार यांच्यावर हल्लाबोलही केला.
छगन भुजबळ यांनी अनेक सभा घेत शक्तिप्रदर्शनही केले. अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांच्या मनधरणीचे प्रयत्न करण्यात आले होते. या घडामोडीत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. यावरून भाजपाच्या कोट्यात एक शिल्लक असलेल्या मंत्रिपदासाठी छगन भुजबळ भाजपात प्रवेश करू शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात झाल्या. परंतु, तसे घडताना दिसले नाही. यातच छगन भुजबळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बड्या नेत्याचे जाहीर कौतुक केले. यावरूनही आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
छगन भुजबळ यांनी केली RSSची स्तुती, केले श्रीराम पूजन अन् आरती
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घुसमट होत असताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. निफाड तालुक्यातील श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी आणि छगन भुजबळ यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली. भैय्याजी जोशी यांच्या कार्याचे कौतुक करताना छगन भुजबळ म्हणाले की, भैय्याजी जोशी यांनी अनेकांना संस्कारी, धार्मिक बनवले. भैय्याजी या ठिकाणी आल्यामुळे आपणही आलो. भैय्याजी यांचे नाव भारतभर आहे. जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिथे त्यांचे नाव आहे. या तीर्थस्थळाला नावारूपाला आणण्याचा विश्वास भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केला आहे, असे भुजबळ म्हणाले. तसेच याप्रसंगी उपस्थित राहून भगवान श्रीरामांची पूजा केली आणि मनोभावे दर्शन घेतले.
दरम्यान, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेले अतिशय पुरातन पतीतपावन राम मंदिर आहे. या मंदिराच्या विकासासाठी २ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून आगामी काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य दिव्य मंदिर उभारण्यात येईल. तसेच त्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे भुजबळ यांनी सांगितले. भैय्याजी जोशी यांनी छगन भुजबळ हे रामभक्त असल्याने या ठिकाणी आल्याचे सांगितले. छगन भुजबळ हे मोठ्या शक्तीचे प्रतीक आहेत. ते बरोबर आल्याने राम मंदिराचे काम अधिक मोठे होईल. त्यांच्या मदतीमुळे आभार व्यक्त करतो, असे भैय्याजी जोशी यांनी म्हटले आहे.