“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:50 IST2025-04-19T17:45:46+5:302025-04-19T17:50:45+5:30
NCP Ajit Pawar Group Chhagan Bhujbal News: दोन्ही ठाकरे एकत्र येणे ही त्यांची हतबलता नाही, त्यांना बाळकडू घरातूनच मिळाले आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
NCP Ajit Pawar Group Chhagan Bhujbal News: दोघांची काय मते आहेत, याची मला कल्पना नाही. अनेकांची मात्र इच्छा आहे की, दोघांनी एकत्र यावे. २०१४ मध्ये एकत्र येण्याची संधी त्यांना चालून आली होती. राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. मागील काही दिवसांत तुम्ही आम्ही कल्पना केली नाही, असे घडले आहे. मात्र, लगेच असे काही होईल असे वाटत नाही, पण माझ्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या चर्चांवर पत्रकारांनी छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
आगामी मुंबईसह राज्यभरातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे यांनी ठाकरे गटाशी युतीबाबत आपले मत व्यक्त केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही काही अटी घालत साद घातली. यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना चांगलेच बळ मिळाले. यासंदर्भात राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे
दोघे एकत्र आले तर ठाकरेंची मोठी ताकद निर्माण होईल. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत आहे. राज ठाकरे यांची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तसेच प्रादेशिक पक्षाचे प्राबल्य आहे. पश्चिम बंगाल, बिहार, दक्षिणेकडे सगळीकडे प्रादेशिक पक्ष हवेत. राज ठाकरे यांच्याकडे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उदय सामंत जातात. जेवण करतात आणि नंतर सांगतात भोजनावर चर्चा झाली. माझा त्यावर विश्वास नाही, राजकीय चर्चा होतच असते. दोन्ही ठाकरे एकत्र येणे ही त्यांची हतबलता नाही, त्यांना बाळकडू घरातूनच मिळाले आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
दरम्यान, ठाकरे बंधू यांच्यानंतर पवार काका-पुतणे एकत्र येतील का? असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. यावर, सगळी कुटूंब एकत्र आली तर सर्वांना आनंद होतो, सर्वांनी एकत्र यावे. राजकारणामुळे जे कुटूंब फुटले, त्यांनी एकत्र आले तर आनंदच होईल, असे भुजबळ म्हणाले.