पोलीस ठाण्यासमोर महिलेची हत्या

By Admin | Updated: September 26, 2016 18:05 IST2016-09-26T18:05:41+5:302016-09-26T18:05:41+5:30

सक्करदरा पोलीस ठाण्यासमोर राहणा-या एका महिलेची निर्घृण हत्या झाली.

The murder of a woman in front of the police station | पोलीस ठाण्यासमोर महिलेची हत्या

पोलीस ठाण्यासमोर महिलेची हत्या

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 26 - सक्करदरा पोलीस ठाण्यासमोर राहणा-या एका महिलेची निर्घृण हत्या झाली. ऐन पोलीस ठाण्यासमोर ओमनगरात सोमवारी दिवसाढवळ्या हत्येसारखा गंभीर गुन्हा घडल्याने नागपुरात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांनाही जबर हादरा बसला आहे.

शशिकला नाशिकराव ठाकरे (वय ६५) असे मृत महिलेचे नाव असून, पोलीस ठाण्यासमोरच्या इमारतीत त्या सहपरिवार राहत होत्या. प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा मुलगा आणि सून नोकरीवर असल्यामुळे ते कर्तव्यावर गेले. तर, नातू शाळेत गेले. दुपारी ३.३०च्या सुमारास नातू शाळेतून परतला तेव्हा त्याला आजी रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसली. त्याने आरडाओरड करून शेजा-यांना कळविले.

शेजा-याने इमारतीच्या वरच्या माळ्यावरून पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या कर्मचा-यांना आरडाओरड करून हत्या झाल्याचे कळविले. त्यामुळे अवघे सक्करदरा पोलीस ठाकरे यांच्या सदनिकेत पोहचले. दरम्यान, पोलीस ठाण्यासमोर वृद्धेची हत्या झाल्याची वार्ता शहरात वायुवेगाने पसरली. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. मोठ्या सख्येत वरिष्ठ पोलीस अधिका-यांनीही घटनास्थळी धाव घेतली. गुन्हेशाखेसह आजूबाजूच्या ठाण्यातील पोलिसांनाही घटनास्थळी बोलवून घेण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर आरोपीचा पत्ता लागला नव्हता. मात्र, मौल्यवान चिजवस्तू लंपास करण्याच्या हेतूनेच लुटारूने ही हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलीस वर्तवित होते.

Web Title: The murder of a woman in front of the police station