मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 06:02 IST2025-08-20T06:01:11+5:302025-08-20T06:02:48+5:30

नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट | विदर्भात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता | अतिवृष्टीने उद्भवलेल्या पूरस्थितीने नांदेड जिल्ह्यात घेतले आठ बळी | पूर ओसरला, स्वप्ने गेली वाहून; नांदेडच्या चार गावांमध्ये हाहा:कार

Mumbai's lifeline local train disturbed due to heavy rainfall Raigad Pune areas still on 'red alert' eight dead in Nanded district | मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी

मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी

चंद्रशेखर पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, मुखेड (जि. नांदेड): लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील ढगफुटीने सवप्णगाव, हासनाळ, भिंगोली व भासवाडी या गावांतील घरांमध्ये अनेक जण अडकून पडले होते. त्यातील तीनशेहून अधिक जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. हासनाळ गावातील आणखी दोघांचे मृतदेह मंगळवारी आढळले. धड़कनाळ येथील पुलावरून कार व ऑटो वाहून गेली होती. त्यातील चौघे बेपत्ता होते. त्यापैकी दोन व एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे, मृतांची संख्या आता आठ झाली आहे.

जमीनदोस्त घरे; अश्रू अनावर

मोठ्या कष्टाने उभारलेली घरे एका रात्रीतच जमीनदोस्त झाली. मंगळवारी पूर ओसरल्यानंतर नागरिकांना विदारक दृश्य बघून अश्रू अनावर झाले. घरात उरले-सुरलेले साहित्य गोळा करून नव्याने संसार उभा करण्याची अनेकांची धडपड सुरू होती.
जवळपास साडेतीनशेहून अधिक घरे मातीमोल झाली. त्यातील साहित्य निवारा केंद्रात नेण्यासाठी नागरिकांची घाई चालली होती. त्यांना सैन्य दलाचे जवानही मदत करीत होते. पूर ओसरला, पण या गावकऱ्यांची स्वप्ने मात्र वाहून गेली होती.

महिनाभराचा पाऊस तीन दिवसांत

मुंबई/ठाणे/नवी मुंबई: ऑगस्ट महिन्यात मुंबईमध्ये सरासरी ५५० मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. परंतु रविवारपासून मुंबईत आजपर्यंत म्हणजे रविवार, सोमवार आणि मंगळवार या तीन दिवसात ५०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. थोडक्यात एका महिन्याचा पाऊस तीन दिवसात पडला आहे. चौतीस तास धावणारी मायानगरी मुंबई सतत दोन दिवसांच्या झोडपधारांनी मंगळवारी पूर्णपणे ठप्प झाली, ठाणे आणि नवी मुंबईसह संपूर्ण कोकणातील नागरिकांनाही मोठा फटका बसला. लोकलसेवा ठप्प झाल्याने प्रवासी ठिकठिकाणी अडकले.

आज कोणता अलर्ट?

बुधवार, दि. २० ऑगस्टला संपूर्ण कोकण परिसराला ऑरेंज तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट' देण्यात आला आहे.

महामुंबईत ३ ठार

मुंबईच्या मलबार हिल परिसरात सोमवारी सकाळी संरक्षक भिंत कोसळून सतीश तिकै (५५) है ठार झाले. ठाण्याच्या मुरबाडमधील पाडाळे धरणाजवळ म्हशी चरण्यासाठी गेलेला समीर राऊत (२५) हा तोल गेल्याने बुडाला. रायगडच्या मुरुड तालुक्यातील मिठेखार भागात मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने विठ्ठाबाई गायकर (७५) यांचा मृत्यू झाला.

सोमवारी सकाळी साडेआठ ते मंगळवारी सकाळी साडेआठ - २३८ मिमी

  • वडाळा     २०५
  • सायन     १९६
  • वरळी     १७९
  • विक्रोळी     २६८
  • पवई     २५७
  • मरोळ     २६२
  • चकाला         २५५
  • वर्सोवा     २५०
  • अंधेरी     २४९

(सोमवारी पहाटे चार ते मंगळवार दुपारी तीन वाजेपर्यंत)

मुंबईची पाऊसकोंडी

  • रस्त्यावर पाणीच पाणी, द्रुतगती महामार्गावरही काही काळ वाहतूक बंद
  • उच्च न्यायालयाचे दुपारच्या सत्रातील कामकाज रद्द
  • २५० हून अधिक विमानांना पावसाचा फटका
  • ठाणे : दोन दिवसांत ३३७ घरांची पडझड
  • रायगड : कुंडलिका, अंबा नद्या धोका पातळीवर
  • पालघर : पुरात अडकलेल्या ३० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले


तब्बल १२ ते १४ लाख एकरवरील पिकांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान

राज्यात अतिवृष्टीमुळे गेल्या तीन - चार दिवसांत १२ ते १४ लाख एकर जमिनीवरील पिके बाधित झाली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काही भागांत अजूनही रेड अलर्ट आहे. राज्य सरकार सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहे.  अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तत्काळ भरपाई देण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे, तर पिकांच्या पंचनाम्यांचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

बचाव यंत्रणा अलर्ट मोडवर

राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. जिथे शक्य आहे तिथे ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगण्यात आले आहे. राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफ अलर्टवर आहेत. धरणांच्या विसर्गाबाबत शेजारील राज्ये सहयोग करत आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

विद्यापीठाच्या परीक्षा पुढे

मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने संलग्नित सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) आज, बुधवारी २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

Web Title: Mumbai's lifeline local train disturbed due to heavy rainfall Raigad Pune areas still on 'red alert' eight dead in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.