"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 14:30 IST2026-01-11T14:27:34+5:302026-01-11T14:30:03+5:30
Mumbai Municipal Corporation Election 2026: समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांची मंत्री नितेश राणेंवर वादग्रस्त टीका.

"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
Mumbai Municipal Corporation Election 2026: महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे, तसा प्रचाराचा वेग वाढतोय. या प्रचारादरम्यान, नेते एकमेकांवर अनेकदा टोकाची आणि वादग्रस्त टीकाही करत आहेत. अशातच आता, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आसिम आझमी यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात बोलताना अबू आसिम आझमी यांनी नितेश राणेंवर वैयक्तिक टीका करत त्यांना “बुटका मंत्री” आणि “नेपाळ्यांसारखा दिसतो” अशी वादग्रस्त टीका केली. यासोबतच त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया देत, “मला ताकद मिळाली, तर अशा मंत्र्याची जीभ कापली नाही, तर एका बापाची औलाद नाही,” असे वक्तव्यही केले आहे.
Watch: Samajwadi Party state president Abu Azmi says, "You can build a mosque with your own money and offer your prayers. But a minister here says, 'If you want to read the Quran Sharif, go to Pakistan and read it,' doesn’t he? Give strength to Abu Azmi—if such abusive language… pic.twitter.com/71O6o5SSSU
— IANS (@ians_india) January 11, 2026
नितेश राणेंच्या वक्तव्यांवरुन संताप
अबू आसिम आझमी यांनी नितेश राणेंच्या हिंदुत्वविषयक आणि धार्मिक मुद्द्यांवरील विधानांचा संदर्भ देत आपला रोष व्यक्त केला. त्यांनी आरोप केला की, “एक मंत्री उघडपणे मस्जिदीत घुसून मुसलमानांना मारण्याची भाषा करतो. आम्ही काय कमकुवत आहोत का? आजपर्यंत आम्ही कोणत्याही मुसलमानाला मंदिराबाहेर उभे राहून घोषणा द्यायला सांगितले नाही. उलट रामनवमीच्या दिवशी आम्ही पाणी देण्यासाठी उभे राहतो. मात्र, देशात राहायचे असेल तर वंदे मातरम म्हणावेच लागेल, अशाप्रकारची विधाने केली जातात. या अशा विधानांवर आमचा आक्षेप आहे,” अशी प्रतिक्रिया आझमींनी दिली.
नितेश राणे काय म्हणाले होते?
वादाची ठिणगी नितेश राणेंच्या अलीकडील वक्तव्यांमुळे पडली. हिंदुत्व, राष्ट्रवाद तसेच रोहिंग्या-बांगलादेशी घुसखोरीवर बोलताना राणे म्हणाले होते की, “मी हिंदुत्व आणि राष्ट्रवादासाठी काम करतो, ध्रुवीकरणासाठी नाही.” धार्मिक मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या दगडफेकीवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सांगितले की, “ईद किंवा मोहरमदरम्यान शांतता असते, मग रामनवमी किंवा हनुमान जयंतीला गोंधळ का होतो? आमचा विरोध कोणत्याही विशिष्ट समुदायाविरोधात नाही. देशभक्त मुसलमानां आमचा विरोध नाही", असेही त्यांनी नमूद केले.