एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:28 IST2025-12-18T19:24:40+5:302025-12-18T19:28:15+5:30
Mahayuti Maharashtra Politics: आढावा बैठकीनंतर सुनिल तटकरे यांनी साधला माध्यमांशी संवाद

एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
Mahayuti Maharashtra Politics: लोकसभा आणि विधानसभेत भाजपा, शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढली. लोकसभेतून धडा घेत विधानसभेत महायुतीने दणदणीत यश मिळवले. आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान असून १६ तारखेला निकाल लागणार आहे. या निवडणुकांसाठी सर्वात चर्चेत असलेल्या मुंबई पालिकेसाठी भाजपा आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढणार आहे. पण नवाब मलिक यांच्या मुद्द्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीचा भाग नाही. तसेच, मुंबईपाठोपाठ पुण्यातही भाजपा आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार असल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी महायुतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तटकरे यांनी आज पक्षातंर्गत मुंबईसह वेगवेगळ्या महानगरपालिकांचा आढावा घेतला. तिथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले.
"महायुतीत सामंजस्य कसं टिकेल हाच प्रयत्न"
"महायुतीतील सामंजस्य कसं टिकलं जाईल असा प्रयत्न राहणार आहे. नवाब मलिक हे आमच्या पक्षातंर्गत निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे महायुती म्हणून बोलणी आणि वाटाघाटी होत असतात, त्यात राज्यपातळीवर नेते सहभागी असतात. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय आज किंवा उद्या होईल. मुंबई महानगरपालिकासहीत इतर महानगरपालिकेत महायुती होण्याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्याशी चर्चा करेन आणि पुन्हा याविषयावर चर्चा करुन पुढची पावले महायुतीच्या दृष्टीकोनातून करता येऊ शकते हा प्रयत्न असणार आहे," असे सुनील तटकरे म्हणाले.
"प्रदेशाध्यक्ष या नात्याने मुंबईसह सगळा विभाग माझ्या अखत्यारीत"
"अमित साटम काय म्हणाले यावर मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. या देशाचे नेते अमित शहा यांच्याजवळ प्रफुल पटेल व मी चर्चा केली आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माझी चर्चा झाली आहे. त्यानंतर दादा, मी व प्रफुल पटेल आम्ही सखोल चर्चा केली असली तरी पुन्हा एकदा दादांशी चर्चा करेन. कारण प्रदेशाध्यक्ष या नात्याने मुंबईसह सगळा विभाग माझ्या अखत्यारीत येतो. महायुती म्हणून लढावं हा आमचा प्रयत्न राहिल. त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच मी कालपासून मुंबईत आहे. शनिवारी यावर सकारात्मक चर्चा करु आणि अंतिम निर्णय जो होईल. तो आपल्यासमोर ठेवू असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना सांगितले.