खासगी शाळांमध्येही शिक्षकांची भरती सीईटीमार्फत करण्याच्या हालचाली

By Admin | Updated: August 21, 2015 22:53 IST2015-08-21T22:53:40+5:302015-08-21T22:53:40+5:30

शिक्षण सहसंचालकांनी एका दिवसात मागितली माहिती.

Movement of teachers in private schools through CET | खासगी शाळांमध्येही शिक्षकांची भरती सीईटीमार्फत करण्याच्या हालचाली

खासगी शाळांमध्येही शिक्षकांची भरती सीईटीमार्फत करण्याच्या हालचाली

सुहास वाघमारे /नांदुरा (बुलडाणा): राज्यातील सर्व खाजगी व्यवस्थापनातील शाळांमधील शिक्षक प्रवर्गाची पदे सीईटीमार्फत भरण्याचे संकेत शासन स्तरावर सुरू असलेल्या हालचालींमधून प्राप्त होत आहेत. या मुद्यावर काही शाळा व्यवस्थापनांनी न्यायालयात धाव घेतली असली तरी, शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना २0 ऑगस्ट रोजी ई-मेल पाठवून जिल्ह्यातील अनुदानित खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती एका दिवसात मागितली आहे. राज्यात खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांना शासनाकडून वेतन मिळते. रिक्त पदांची भरती करण्याचे अधिकार मात्र शाळा व्यवस्थापनाला आहेत. त्यामुळे सर्व खासगी व्यवस्थापनातील शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे ही भरतीपूर्व केंद्रीय निवड परिक्षा (सीईटी) मार्फत करावी, अशी मागणी होत असून, त्यासाठी शासन अनुकुल आहे. याबाबत अद्यापही ठोस निर्णय झालेला नसला तरी, त्या दिशेने हालचाली मात्र सुरू झाल्यात. त्याचाच एक भाग म्हणून, २0 ऑगस्ट रोजी प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना पत्र देवून जिल्ह्यातील मान्यताप्राप्त अनुदानित खासगी प्राथमिक शाळांमधील रिक्त पदांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या रिक्त पदांची माहिती एका प्रपत्रामध्ये माध्यमनिहाय व संस्थानिहाय मागविण्यात आली आहे. रिक्त पदांची माहिती न्यायालयासमोर, तसेच शासनासमोर सादर केली जाणार आहे. राज्यात डिएड व डिटीएड शिक्षण घेतलेले लाखो बेरोजगार युवक, यापूर्वी झालेल्या सीईटीतून अद्यापही नोकरीची संधी न मिळालेले, तसेच अतिरिक्त ठरल्याने समायोजनाच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक शिक्षकांचे लक्ष रिक्त पदांकडे लागले आहे. न्यायालय आणि शासन या मुद्यावर काय निर्णय घेते, याची त्यांना प्रतिक्षा आहे.

Web Title: Movement of teachers in private schools through CET