महाशिवआघाडीत एकोपा; शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वजीत कदमांची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 14:19 IST2019-11-15T14:17:43+5:302019-11-15T14:19:26+5:30
उभय पक्षातील नेते आतापासूनच एकमेकांशी जुळवून घेण्याच्या तयारीत लागले आहे. यात काँग्रेस सर्वात पुढे दिसत असून उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान कदम यांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती.

महाशिवआघाडीत एकोपा; शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वजीत कदमांची हजेरी
मुंबई - राज्यातील सत्तापेच मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येवून सरकार स्थापन करणार असं सांगितलं जात आहे. ही बोलणी सुरू असलेली तरी महाशिवआघाडी झाली, हे अधिकृत सांगण्यात आलेलं नाही. परंतु, ही घोषणा होण्यापूर्वी महाशिवआघाडीत एकोपा वाढत असल्याचे चित्र आहे.
परतीच्या पावसाने राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वच पक्षाचे प्रमुख नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी गेले. तर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
उद्धव यांनी सांगली जिल्ह्याला भेट दिली. येथील नेवरी गावातील शेतीच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी काँग्रेसनेते आणि पलूस-कडेगाव मतदार संघाचे आमदार विश्वजीत कदम आवर्जुन उपस्थित होते. त्यामुळे मतदार संघात चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना यांच्यातील आघाडीची बोलणी जोरात सुरू आहे. तसेच निर्णय सकारात्मक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उभय पक्षातील नेते आतापासूनच एकमेकांशी जुळवून घेण्याच्या तयारीत लागले आहे. यात काँग्रेस सर्वात पुढे दिसत असून उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान कदम यांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती.