Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 07:26 IST2025-11-20T07:13:14+5:302025-11-20T07:26:14+5:30
Ashish Shelar on Nawab Malik:मनी लाँड्रिंगप्रकरणी जामिनावर सुटलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतला आहे. या निर्णयाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विरोध केला.

Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनी लाँड्रिंगप्रकरणी जामिनावर सुटलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतला आहे. या निर्णयाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विरोध केला असून मलिक यांच्यावरील आरोप गंभीर असल्याने अजित पवार गटाशी मुंबईत युती केली जाणार नाही. ही कार्यकर्त्यांची भूमिका असून मलिक यांच्यासोबत आम्ही जुळवून घेऊ शकत नाही, असा इशारा शेलार यांनी दिला आहे. शेलार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीपाठोपाठ महायुतीमध्येही फुटीची शक्यता निर्माण झाली आहे.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी मलिक यांना २०२२ मध्ये अटक झाली होती. त्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपने हे प्रकरण लावून धरले होते. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर जामिनावर बाहेर आलेल्या मलिक यांनी अजित पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मलिक यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाला भाजपने विरोध केल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मलिक यांच्याकडे अजित पवार गटाने निवडणुकीची जबाबदारी दिली आहे.
निर्णयाचा फेरविचार करावा
मंत्री शेलार म्हणाले, “अजित पवार यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा. विधानसभा निवडणुकीत मलिक यांच्याशी फारकत घेताना आमची भूमिका स्पष्ट केली होती. ते जर मुंबईत राष्ट्रवादीचे नेतृत्व करणार असतील, निवडणुकीची जबाबदारी सांभाळणार असतील तर, त्यांच्याशी, त्यांच्या पक्षातील नेतृत्वाशी भाजप जुळवून घेऊ शकत नाही.”