"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 18:03 IST2025-07-19T18:02:08+5:302025-07-19T18:03:03+5:30
नितेश राणेंच्या 'मदरसे बंद करून टाका' विधानावर प्रत्युत्तर

"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
Nitesh Rane vs MNS, marathi language row: महाराष्ट्रात मराठी विरूद्ध अमराठी असा सध्या संघर्ष सुरू आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे असा आग्रह सर्वत्र दिसत आहे. हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात करण्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्रिभाषा सुत्राअंतर्गत हिंदी भाषा शिकवली जाणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. त्यावर, तुम्ही हिंदी सक्ती केलीत तर आम्ही यावेळी शाळा बंद करून टाकू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. राज यांच्या या विधानावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. शाळांऐवजी मदरसे बंद करा, असे ते म्हणाले. त्यांच्या या प्रतिक्रियेवर मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
संदीप देशपांडे यांचे उत्तर
मनसेचे नेते संदीप देशपांडे हे आपल्या पक्षाची भूमिका रोखठोकपणे मांडत असतात. नितेश राणे यांनी मदरसे बंद करण्याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेचा संदीप देशपांडे यांनी समाचार घेतला. "मला मंत्री नितेश राणे यांना एक प्रश्न विचारायचा आहे की सगळं जर आम्हीच करायचं असेल, तर नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?" असा खोचक सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.
" सगळ्या गोष्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार असेल तर मंत्री म्हणून मिरवणारे श्री. नितेश राणे काय करणार ? ते पंखा हलवणार का ?"
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 19, 2025
श्री. संदीप देशपांडे यांचं श्री. नितेश राणेंना प्रतिउत्तर.. pic.twitter.com/vE73c7xZWc
नितेश राणे काय म्हणाले?
नितेश राणे म्हणाले होते, "शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका. कारण त्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय दुसरं काहीच होत नाही. बुलढाण्यामधील एका मदरशामध्ये येमेनचे नागरिक लपले होते. असंख्य मदरशांमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडतात, तलवारी सापडतात. हिंदू समाजामध्ये भांडण लावण्यापेक्षा, आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका."