mns leader sandeep deshpande slams shivsena over parner corporators issue | "रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादीकडे भीक मागताहेत"

"रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादीकडे भीक मागताहेत"

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये छोट्या-मोठ्या विषयांवरून कुरबुरी सुरू असताना राष्ट्रवादीनं अहमदनगरमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. पारनेरमधील या राजकीय घडामोडीचे धक्के मुंबईपर्यंत पोहोचले. यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बारामतीला फोन करत आपले नगरसेवक परत पाठवा, असा निरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे. यावरून मनसेनं शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेनं मुंबईत मनसेचे सहा नगरसेवक फोडले होते. त्याचा दाखला देत मनसेनं शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.

मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन, शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. “रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरुन सर्जिकल स्ट्राईकची फुशारकी मारणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादी काँग्रेसकडे भीक मागत आहेत. कालाय तसमें नमः”, अशा शब्दांत देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेनं ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबई महापालिकेतील मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक फोडले होते. महापालिकेतील सत्ता स्थिर राखण्यासाठी शिवसेनेनं ही खेळी केली होती. मनसेवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचं त्यावेळी शिवसेना नेत्यांनी म्हटलं होतं. मनसेचे नगरसेवक फोडल्यानं शिवसेनेचं महापालिकेतलं संख्याबळ वाढलं. शिवसेनेच्या या खेळीमुळे मनसेला जोरदार धक्का बसला. आता काहीशी तशीच परिस्थिती शिवसेनेवर पारनेरमध्ये ओढवली आहे. अजित पवार यांच्या खेळीमुळे शिवसेनेला हादरा बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेचा संदर्भ देत मनसेनं शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

पारनेरमध्ये काय घडलं?
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी (४ जुलै) राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने दिलेला हा ‘पंच’ शिवसेनेसाठी धक्का मानला जात आहे. पारनेर नगरपंचायतीतील शिवसेनेचे पाच नगरसेवक शनिवारी बारामतीला पोहोचले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. डॉ. मुदस्सीर सय्यद, किसन गंधाडे, नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने आणि वैशाली औटी यांच्यासह शिवसेनेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला.

राज्याच्या सत्तेत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याआधी पारनेरमध्ये या दोन पक्षांनी सत्तेचं गणित जमवलं होतं. आता मात्र राष्ट्रवादीनं एकहाती सत्ता मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी अलीकडेच जामखेडमध्ये भाजपाच्या नगरसेवकांना पक्षात घेतलं. त्या पाठोपाठ, पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी सत्तेत सोबत असलेल्या शिवसेनेच्या शिलेदारांच्या हातावरच घड्याळ बांधलं. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना धक्का बसला.

शिवसेनेला राष्ट्रवादीचा 'दे धक्का'; निवडणुकीच्या तोंडावरच पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडले!

'मातोश्री'तून थेट 'बारामती'ला फोन; "आमचे नगरसेवक परत पाठवा!"

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mns leader sandeep deshpande slams shivsena over parner corporators issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.