मराठीच्या आग्रहासाठी राज ठाकरे आणि मंत्री उदय सामंत यांची भेट; "येत्या ८-१० दिवसांत.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 10:47 IST2025-04-05T10:43:46+5:302025-04-05T10:47:42+5:30

परराज्यातून जे आलेत त्यांनाही आम्ही सन्मान देतो पण माझ्या मराठी भाषेचा सन्मान कायमस्वरुपी टिकला पाहिजे ही भूमिका राज ठाकरेंची आहे आणि तीच राज्य शासनाचीही आहे असं उदय सामंत यांनी म्हटलं.

MNS chief Raj Thackeray and Minister Uday Samant meet regarding Marathi demand | मराठीच्या आग्रहासाठी राज ठाकरे आणि मंत्री उदय सामंत यांची भेट; "येत्या ८-१० दिवसांत.."

मराठीच्या आग्रहासाठी राज ठाकरे आणि मंत्री उदय सामंत यांची भेट; "येत्या ८-१० दिवसांत.."

मुंबई - बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे या मागणीवरून मनसे आक्रमक झाली आहे. राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मनसैनिकांकडून बँकांमध्ये जाऊन निवेदन दिले जात आहे. याच विषयाबाबत चर्चा करण्यासाठी राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंनी मराठीच्या आग्रहाबाबत काही सूचना केल्या. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍याशी चर्चा करू अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की,  राज्यातील संस्था, बँका याठिकाणी मराठी भाषेबाबत ज्या घटना घडतायेत त्यावर प्रतिबंध कसा लावायचा याबाबत राज ठाकरेंनी सूचना केल्या. त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यात काय सुधारणा करता येतील याचे प्रयत्न करू. अनेक भाषा राज्यात बोलल्या जातात. इतर राज्यातून लोक इथं आले आहेत त्यांचा आम्हाला आदर आहे. परंतु ज्यापद्धतीने मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातोय, दादागिरी केली जाते त्यावर काही मार्ग काढला पाहिजे त्याला कायदेशीर वलय असले पाहिजे असं राज ठाकरेंचं मत आहे. त्याबाबत आज आमची चर्चा झाली. ही चर्चा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घालणार आहे असं त्यांनी सांगितले. 

येत्या ८-१० दिवसांत बैठक घेऊ...

तसेच औद्योगिक क्षेत्रात मराठीचा वापर चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. काही आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत, ज्यांनी परकीय गुंतवणूक राज्यात केली आहे त्यांनी मराठीचा सन्मान केला पाहिजे, मराठी शिकलं पाहिजे असा आग्रह राहील पण सक्ती करू शकत नाही. महाराष्ट्रात ज्या बँका आहेत त्यांचा संवाद सामान्य माणसांशी होत असतो, जे व्यवहार आहेत ते मराठीत झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे. त्यासाठी येत्या ८-१० दिवसांत पोलीस विभाग आणि राज्यातील जिल्हाधिकारी यांची बैठक घेणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक समिती गठीत केली आहे. त्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत आणि सदस्य पोलीस अधीक्षक आहेत. त्यामुळे या समितीची बैठक घेऊन मराठीबाबत कुणी उलटसुलटं करत असेल तर त्यावर काय कारवाई करायची ही भूमिका आम्ही घेऊ असं मंत्री उदय सामंत म्हणाले.

जी राज ठाकरेंची भूमिका तीच राज्य सरकारचीही...

दरम्यान, महाराष्ट्रात जी व्यक्ती राहते, त्याला मराठी आले पाहिजे, तिने मराठीचा सन्मान केला पाहिजे ही वस्तूस्थिती आहे. इतर भाषेचा आम्ही आदर करतो, कुणीही अनादर करत नाही. परराज्यातून जे आलेत त्यांनाही आम्ही सन्मान देतो पण माझ्या मराठी भाषेचा सन्मान कायमस्वरुपी टिकला पाहिजे ही भूमिका राज ठाकरेंची आहे आणि तीच राज्य शासनाचीही आहे. बँक कर्मचाऱ्यांनी घाबरण्याचं कारण नाही. बँकाही आपल्याला आवश्यक आहेत. मराठी बोलण्याचा आणि मराठी भाषेवर अन्याय न करण्याचा हा मुद्दा आहे. मराठी भाषेत जर कुणी बोलत असेल तर त्याचे खच्चीकरण करण्याचा काही ठिकाणी जो प्रकार घडला त्याबाबत हा विषय आहे. त्यामुळे बँकांच्या अधिकाऱ्यांनी घाबरावं, घाबरून काम करावे असं काही नाही. आम्ही शासन म्हणून बँकांसोबत आहोत असंही उदय सामंत यांनी सांगितले.  

Web Title: MNS chief Raj Thackeray and Minister Uday Samant meet regarding Marathi demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.