“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 14:00 IST2025-07-14T13:56:08+5:302025-07-14T14:00:33+5:30
Shiv Sena Shinde Group News: जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र दोन्ही पक्षांकडून या चर्चा फेटाळण्यात आल्या.

“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
Shiv Sena Shinde Group News: शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र त्यांनी राजीनामा दिला नसून प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी शरद पवार यांनी १५ जुलै रोजी मुंबईत पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पाटील यांचा राजीनामा घ्यायचा की त्यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवायचे याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, विश्वसनीय सूत्रांनुसार, पाटील आता या पदावर रहायला तयार नसून त्यांच्या जागी आमदार शशिकांत शिंदे यांची वर्णी लागू शकते. यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यातच आता जयंत पाटील यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न करू, असा निर्धार शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी केल्याचे सांगितले जात आहे.
जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, या चर्चेचा शरद पवार गटाकडून इन्कार करण्यात आला. भाजपानेही पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, रवींद्र चव्हाण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले, पूर्वी मी होतो, ही संघटनात्मक प्रक्रिया आहे. जयंतराव खूप दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष होते, त्यांना बदलणार याचा अर्थ असा नाही की ते पक्ष सोडणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही जयंत पाटील भाजपात येणार असल्याबाबत विचारले असता त्यांनी मान हलवून 'नाही' असे उत्तर दिले. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी याबाबत मोठे विधान केले.
जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे अन्य पक्षात जाणार असतील तर त्यांना शिंदेसेनेत आणण्यासाठी प्रयत्न करू, असे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच गुलाबराव देवकर यांना अजित पवार गटात घेऊ नका, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. मात्र, तरीही त्यांनी देवकर यांना पक्षात घेतले. अशा चुकीच्या माणसांना पाठीशी घालणे चुकीचे असल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, त्यांचा राजीनामा मी पाहिलेला नाही. वाचलेला नाही. उद्या पक्षाची बैठक आहे, त्यात कळेल. मी जयंत पाटलांशी रोज बोलते. जी घटना आमच्या आयुष्यात झाली नाही, त्याबद्दल काय बोलणार? राजकीय पक्ष, संघटनेत जी जबाबदारी पडेल, तिथे प्रत्येक कार्यकर्ता काम करायला तयार आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांनी संघर्ष केला आहे. कितीही आव्हान आली तरी कालही, आजही आणि उद्याही संघर्ष करायला तयार असतात, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.