"थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा"; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 16:08 IST2025-11-28T16:05:17+5:302025-11-28T16:08:34+5:30
मंत्री गिरीश महाजन यांनी बांधकाम कामगारांना मच्छरदाणीत झोपण्याचा सल्ला दिला.

"थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा"; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला
Girish Mahajan: राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी बांधकाम कामगारांसाठी असलेल्या सरकारी योजनांवर बोलताना केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी बांधकाम कामगारांना उपरोधात्मक सल्ला दिला. मात्र गिरीश महाजन यांनी दिलेल्या सल्ल्याची सर्वत्र चर्चा सुरु झालीय. या वक्तव्यानंतर महाजन यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला.
बांधकाम कामगारांना मच्छरदाणीत 'झोपण्याचा' सल्ला
भडगाव येथील सभेत बोलताना गिरीश महाजन यांनी बांधकाम कामगारांसाठी असलेल्या सरकारी सुविधांचा उल्लेख केला. याच संदर्भात, कामगारांना सरकारने दिलेल्या वस्तूंपैकी मच्छरदाणीचा उल्लेख करताना त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. बांधकाम कामगारांना सरकारने मच्छरदानी दिली आहे. त्यामुळे थकून आल्यावर मच्छरदाणीत बायकोसोबत झोपा असा सल्ला गिरीश महाजन यांनी दिला. भडगाव येथील जाहीर सभेत गिरीश महाजन बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते.
गिरीश महाजन म्हणाले:
"बांधकाम करणाऱ्या कामगारांना पेट्या मिळाल्या आहेत. त्यामध्ये ग्लोव्हज दिले, बॅटरी दिली, डब्बा दिला, मच्छरदानी पण दिली. कामगार घरी थकून भागून गेल्यानंतर नवरा बायकोने मच्छरदानीत झोपा. डास चावता कामा नये." महाजन यांच्या या वक्तव्यामुळे सभेत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला.
कामगारांच्या योजनांवर बोलताना महाजन यांनी हे उपहासात्मक विधान केले असले तरी, त्यांच्या बोलण्याचा नेमका रोख सरकारी योजनांची अंमलबजावणीवर होता असं म्हटलं जात आहे. गिरीश महाजन यांच्या राजकीय वक्तव्यांची शैली नेहमीच चर्चेचा विषय ठरते. मात्र आता त्यांचे'मच्छरदाणी आणि झोपण्याचे' वक्तव्य विरोधकांना आयतेच कोलीत ठरले आहे. या वक्तव्यावरून येणाऱ्या काळात राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.