हवामान विभागाचा इशारा! महाराष्ट्रात दोन दिवसांत अवकाळी पाऊस; अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 06:34 IST2025-04-14T06:32:49+5:302025-04-14T06:34:10+5:30
Maharashtra Weather Alert: पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र, राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

हवामान विभागाचा इशारा! महाराष्ट्रात दोन दिवसांत अवकाळी पाऊस; अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा
पुणे : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा १ ते २ अंश सेल्सिअसने उतरला आहे. मात्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुढील एक ते दोन दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather Alert Thunderstorms)
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दरम्यान, अकोला येथे ४२.४ सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. तर, जळगाव, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी गारासह अवकाळी पाऊस झाला.
पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र, राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला. त्यामुळे काही भागांत पावसाचा अंदाज आहे.
जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक आदी भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला. सोलापूर अद्यापही ४० अंशाच्या पुढेच आहे. पुढील दोन दिवस नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागांत पावसाचा अंदाज आहे.
काढलेला मका गेला वाहून
जळगाव जिल्ह्यात रावेरनंतर चोपडा तालुक्यात रविवारी दुपारी दोन वाजता ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला, तर काही ठिकाणी गाराही पडल्या. गहू, केळी, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे.
जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी काढलेला मका पाण्यात वाहून गेला. धानोरा (ता. चोपडा) येथे रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक तास पाऊस पडला. १२ मिनिटे गारपीट झाली.
सलग दुसऱ्या दिवशी गारपीट
नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही गारपीट झाल्याने उन्हाळ कांद्यासह द्राक्ष आणि गहू पिकांचे नुकसान झाले आहे.
रविवारी येवला, निफाड आणि चांदवड तालुक्यांतील काही गावांना गारपिटीचा फटका बसला.
उत्तर महाराष्ट्रात दाणादाण
गेले दोन दिवस राज्यात झालेल्या हवामान बदलाचा फटका उत्तर महाराष्ट्राला बसला असून जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांची दाणादाण उडाली.
अकोलेमध्ये गारांचा मारा
अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यात धामणगाव आवारी आणि परिसरात रविवारी दुपारी तासभर वादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.