हिंदी सक्तीच्या मुद्द्याने संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. काही दिवसांपूर्वी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाराला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. याच पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर येथे परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून मोर्चा काढण्यात आला होता. याविरोधात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समिती आदींनी मोर्चाची हाक दिली होती. मात्र या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. याशिवाय मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि आंदोलकांची धरपकड सुरू झाली. त्यातूनच मीरारोडमध्ये संघर्ष वाढला. या सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली आणि मोर्चा निघालाच. या संपूर्ण प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.
मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे. यानंतर आता मंत्री प्रताप सरनाईकही तेथे पोहोचले आहेत. मात्र त्यांना आता तेथे विरोध होतोय? असे विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी तुम्हाला सांगू, या संपूर्ण गोंधळाला केवळ आणि केवळ गृह विभागच जबाबदार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, एकदा असे बोलतात, एकदा असे बोलतात. हीच ती समस्या आहे." सुप्रिया एबीपी माझा सोबत बोलत होत्या.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "मी समजत होते की, भारतीय जनता पक्ष हा एक सुसंकृत पक्ष आहे. मात्र, दुर्दैवाने गेल्या काही दिवसांत, भाषा त्यांची वागणूक, ज्या धमक्या दिल्य जात आहेत, हे खऱ्या भारतीय जनता पक्षाला न शोभणारं आहे आणि हे लोकशाहीला न शोभणारे आहे"
हिंदी मराठीच्या वादाला कोण जबाबदार? यासंदर्भात बोलताना सुप्रिया म्हणाल्या, "तिसऱ्या भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार म्हणतायत मी नाही केली, एकनाथ शिंदेंची टीम (शिवसेना) म्हणतेय आमची नाही. मग जबाबदार कोण आहे? भारतीय जनता पक्षानेच सक्ती केली ना." एवढेच नाही तर, "आम्ही हिंदीच्या विरोधात नाही. आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही." असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.