Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:24 IST2025-07-04T15:24:38+5:302025-07-04T15:24:38+5:30
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोकण-गोवा आणि घाट भागातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने गोवा आणि कोकण प्रदेशासाठी हवामानाचा इशारा जारी केला. महाराष्ट्रातील चिंताजनक हवामान परिस्थिती लक्षात घेता हवामान विभागाने कोकण आणि गोवा प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर यांसारख्या भागात मुंबई आणि त्याच्या उपनगरांसह, सतत मुसळधार पाऊस पडत आहे.भारतीय हवामान विभागाच्या मते, येत्या काही तासांत कोकण-गोवा जिल्ह्यांतील आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Heavy to Very Heavy rainfall very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa and Ghat areas of South Madhya Maharashtra .
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 4, 2025
Heavy rainfall very likely to occur at isolated places in the districts of North Madhya Maharashtra.
याव्यतिरिक्त, उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ३ ते ४ तासांत पालघर जिल्ह्यातील काही भागात तसेच मुंबई, ठाणे आणि रायगड येथे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, जिथे आधीच अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. आयएमडीने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा येथे अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कल्याण आणि बदलापूरसारख्या उपनगरीय भागात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस पडला.
समुद्राजवळ न जाण्याचा सल्ला
याशिवाय, हवामान विभागाने भरती-ओहोटीच्या हालचालींबद्दल माहिती देखील दिली. मुंबईच्या किनारपट्टीवर संध्याकाळी ६.१८ वाजता अंदाजे ३.३३ मीटर उंच लाटा उसळतील, अशी शक्यता आहे. आज दुपारी १२.३६ वाजाताच्या सुमारास २.५१ मीटर उंच लाट उसळल्याची नोंद करण्यात आली. तर, शनिवारी मध्यरात्री १.११ वाजताच्या १.५९ मीटर लाट उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना समुद्रकिनाऱ्याजवळ न जाण्याचा सल्ला देण्यात आला.
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
नागरी अधिकारी आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले. तसेच नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवाय, आपत्कालीन परिस्थितीची माहिती देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.