महाराष्ट्र निवडणूक निकाल : 'लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 04:35 PM2019-10-24T16:35:41+5:302019-10-24T16:50:07+5:30

Maharashtra Vidhan Sabha Result : बीडच्या परळीत मुंडे बंधू-भगिनी आमनेसामने असल्याने राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं.

Maharashtra Vidhan Sabha Result NCP Rupali Chakankar slams BJP Pankaja Munde | महाराष्ट्र निवडणूक निकाल : 'लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद'

महाराष्ट्र निवडणूक निकाल : 'लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद'

Next

मुंबई - बीडच्या परळीत मुंडे बंधू-भगिनी आमनेसामने असल्याने राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं. प्रचारादरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी एकमेकांवर तोफ डागली होती. प्रचार संपल्यानंतरही दोघांमधली धुसफूस कायम होती. यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली. त्यात धनंजय मुंडेंनी आधीपासूनच आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवत पंकजा मुंडेंचा मोठा पराभव केला आहे. 

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी जवळपास 20 हजार मतांनी विजय मिळवला. मतदान झाल्यानंतरही बीडमधल्या घडामोडी लक्षवेधी ठरल्या होत्या. मुंडे बंधू भगिनींनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे ही लढत राज्यासाठी लक्षवेधी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे. 'लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद' असं ट्वीट रूपाली चाकणकर यांनी केलं आहे. 

पंकजा मुंडे यांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे. खुद्द पंकजा यांनी देखील निकालानंतर तशीच भावना बोलून दाखवली. लोकसभा निवडणुकीत भाजपानं स्वबळावर सत्ता मिळवत 300 चा आकडा पार केला. त्यावर 'अनाकलनीय' अशा एका शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती. पंकजा मुंडेंनीदेखील याच शब्दाचा वापर करत त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. मतदारांनी दिलेला कौल मान्य असल्याचं म्हणत कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असं आवाहन त्यांनी केलं. बीड जिल्ह्यातील राजकारणाचा वेगळा चेहरा निवडणुकीत पाहायला मिळाल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. 

विधानसभा निवडणुकाचा कल जवळपास हाती आलेला आहे. भाजपाच्या चौफेर उधळलेल्या वारूला जनतेनं लगाम घातला असून, त्यांची घोडदौड 100 जागांच्या आसपास थांबण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना आणि भाजपामध्ये अनेक नेत्यांची मेगा भरती सुरू होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते आणि उमेदवार सेना-भाजपानं फोडून स्वतःच्या पक्षात घेतले होते. त्यानंतर त्यांना उमेदवारीही देण्यात आली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास सेना-भाजपानं आयात केलेल्या एकूण 35 आयारामांपैकी 19 जणांचा पराभव झालेला आहे. त्यातील शिवसेनेचे 11 आणि भाजपाच्या 8 आयाराम उमेदवारांचा समावेश आहे. या निकालानंतर शरद पवारांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाची अब की बार 220 पार ही घोषणा जनतेला पटली नाही. सत्ता जाते, सत्ता येते, मात्र जमिनीवर पाय ठेवावे लागतात. पक्षांतराला जनतेनं पाठिंबा दिलेला नाही, असं म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Result NCP Rupali Chakankar slams BJP Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.