Maharashtra Vidhan Sabha Result Cong NCP may have lost 9 seats due to MIM | महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर महायुतीची गाडी १५०च्या आसपास अडली असती
महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर महायुतीची गाडी १५०च्या आसपास अडली असती

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून अब की बार २०० पारची घोषणा देण्यात आली होती. मात्र महाआघाडीनं अनेक मतदारसंघांमध्ये चांगली लढत दिली. त्यामुळे महायुतीची गाडी १६१ वर अडली. महाआघाडीला अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचा फटका बसला. अन्यथा त्यांच्या जागांचा आकडा १२०च्या आसपास पोहोचला असता. 

असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमनं राज्यात केवळ दोनच जागा जिंकल्या. मालेगाव मध्य आणि धुळे शहर मतदारसंघांमध्ये एमआयएमनं विजय मिळवला. मात्र एमआयएमच्या उमेदवारांमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीला नऊ मतदारसंघांमध्ये फटका बसला. याचा थेट फायदा महायुतीला झाला. एमआयएमला मिळालेल्या मतांमुळे सर्वात मोठा फटका चारवेळा आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या नसीम खान यांना बसला. मुंबईतल्या चांदिवली मतदारसंघात खान यांचा केवळ ४०९ मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात शिवसेनेचे दिलीप लांडे विजयी झाले. तर एमआयएमच्या मोहम्मद इम्रान कुरेशींना १,१६७ मतं मिळाली. 

मध्य नागपुरात काँग्रेसचे बंटी बाबा शेळके भाजपाचे उमेदवार विकास कुंभारेंकडून ४,००८ मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात एमआयएमच्या अब्दुल शरीक पटेल यांनी ८,५६५ मतं घेतली. मुस्लिम समाज हा काँग्रेस, राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार समजला जातो. मात्र अनेक ठिकाणी एमआयएमच्या उमेदवारांमुळे मुस्लिम मतांचं विभाजन झालं. त्यामुळे शिवसेना, भाजपाला फायदा झाला. 

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमनं महाआघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असता, तर विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता, अशी आकडेवारी सांगते. वंचित आणि एमआयएममुळे महाआघाडीला २३ जागांवर फटका बसला, असं ट्विट निकालाच्या दिवशी राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. निवडणुकीत महायुतीला १६१ जागा मिळाल्या आहेत. वंचित, एमआयएमनं महाआघाडीसोबत निवडणुकीत लढवली असती, तर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी झाली असती.
 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Result Cong NCP may have lost 9 seats due to MIM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.