...तेव्हा संजय राऊतांच्या बाऊन्सरवर मुख्यमंत्र्यांनी ठोकला होता सिक्सर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 14:21 IST2019-11-05T14:19:27+5:302019-11-05T14:21:36+5:30
Maharashtra Election Result 2019: बाळासाहेबांची आठवण काढत मुख्यमंत्र्यांचं राऊत यांना प्रत्युत्तर

...तेव्हा संजय राऊतांच्या बाऊन्सरवर मुख्यमंत्र्यांनी ठोकला होता सिक्सर
मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 11 दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. भाजपा, शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे सत्तेचा तिढा कायम आहे. सत्तापदांच्या वाटपांचा फॉर्म्युला अद्याप दोन्ही पक्षांना सापडलेला नाही. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत भाजपावर वारंवार टीका करत आहेत. शिवसेनेकडून होणारी टीका जोवर बंद होत नाही, तोपर्यंत चर्चा होणार नाही, असा पवित्रा भाजपानं घेतला आहे.
2018 मध्येही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. भाजपा, शिवसेना सत्तेत सोबत असताना शिवसेना खासदार संजय राऊत सामनामधून वारंवार भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत होते. त्यावेळी लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात राऊत यांनी फडणवीसांची मुलाखत घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी युतीबद्दल विश्वास व्यक्त केला होता. शिवसेनेसोबत नक्की युती होईल, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला फडणवीस यांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचा संदर्भ देत उत्तर दिलं होतं.
शिवसेना हा पक्ष आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालतो. त्यामुळे तथाकथित सेक्युलर पक्षांचा पाडाव करण्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा-शिवसेना एकत्र येणारच, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे तमाम शिवसैनिकांचं दैवत आहेत. त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल, अशी साद मुख्यमंत्र्यांनी घातली होती. बाळासाहेब असते तर त्यांच्या हातात सरकारचा रिमोट द्यायला आवडला असतं, असं प्रांजळपणे सांगत फडणवीस यांनी शिवसैनिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्नदेखील केला होता.
सध्या राज्यातील स्थिती पाहता, सत्ता स्थापनेसाठी भाजपाला शिवसेनेची आवश्यकता आहे. मात्र शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासह सर्वच सत्तापदांचं समान वाटप करण्याची मागणी लावून धरली आहे. याशिवाय आमच्याकडे 175 आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हणत राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाण्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला असून राज्यात राष्ट्रपती राजवट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.